देशाच्या एकतेसाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारावी - पंतप्रधान
गांधीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। “देशाची एकता कमकुवत करणारी प्रत्येक कृती प्रत्येक नागरिकाने टाळली पाहिजे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान आज गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एक
Prime Minister Narendra Modi


Rashtriya Ekta Din programme


Rashtriya Ekta Din programme


पंतप्रधान मोदी स्टॅच्यू आॅफ युनिटी


गांधीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। “देशाची एकता कमकुवत करणारी प्रत्येक कृती प्रत्येक नागरिकाने टाळली पाहिजे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान आज गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित केले. राष्ट्रीय एकता ही काळाची गरज असल्याचे नमूद करत त्यांनी प्रत्येक भारतीयाने एकतेचा संदेश आत्मसात करावा, असे आवाहन केले.

सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरव करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला सर्वोच्च स्थान दिले. मात्र त्यांच्या निधनानंतर आलेल्या सरकारांनी त्या दृष्टीने पुरेसे गांभीर्य दाखवले नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. काश्मीरमधील चुका, ईशान्येकडील आव्हाने आणि देशातील नक्षलवाद–माओवादी हिंसा या सर्वांचा उल्लेख करत त्यांनी राष्ट्रीय सार्वभौमत्वावर थेट धोका असल्याचे सांगितले. पटेल यांच्या धोरणांऐवजी त्या काळातील सरकारांनी कमकुवत दृष्टिकोन स्वीकारल्याने देशाला हिंसाचाराचा फटका बसल्याची टीका त्यांनी केली.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी एकता नगरातील सकाळच्या विहंगम दृश्याचा उल्लेख करत सांगितले की, संपूर्ण देश आज एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. देशव्यापी एकता दौडीत कोट्यवधी भारतीयांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहून नव्या भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्मृतीनाणे आणि विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

काश्मीरच्या विलीनीकरणाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, सरदार पटेल यांनी काश्मीर भारतात पूर्णपणे सामावून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्या काळातील पंतप्रधानांनी ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. त्यातूनच काश्मीरला स्वतंत्र संविधान आणि राजमुद्रेचा दर्जा देण्यात आला, ज्यामुळे देशाला दीर्घकाळ दहशतवादाचा सामना करावा लागला. “आज मात्र कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीर पूर्णपणे देशाच्या मुख्य प्रवाहात सामावले आहे,” असे त्यांनी सांगितले. पाकिस्तान आणि दहशतवादाला आता भारताची खरी ताकद समजली आहे, असे ते म्हणाले.

सध्याच्या विरोधकांवर टीका करत मोदी म्हणाले की, त्यांना सरदार पटेल यांच्या विचारांचे विस्मरण झाले आहे. 2014 नंतरच्या काळात देशाने पुन्हा एकदा पोलादी निर्धाराचा भारत पाहिला आहे. “हा सरदार पटेल यांच्या प्रेरणेने उभा राहिलेला भारत आहे, जो कधीच स्वतःच्या सुरक्षा आणि सन्मानाशी तडजोड करत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधानांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘पंचतीर्था’चा उल्लेख करत सांगितले की, देश आता विभाजनकारी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकतेच्या भावनेला बल देत आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात दुर्लक्षित राहिलेले स्थळ आता राष्ट्रीय स्मारकांमध्ये रूपांतरित झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा सन्मान म्हणून ‘प्रधानमंत्री संग्रहालय’ उभारल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन विरोधी विचारसरणीच्या नेत्यांनाही सन्मानित करून सरकारने राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, “राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय एकतेवर हल्ला करणारी मानसिकता ही वसाहतवादी विचारसरणीचे प्रतीक आहे.” ब्रिटिशांनी ज्या वसाहतवादी मानसिकतेचा वारसा ठेवला, तीच मानसिकता काही राजकीय पक्षांनी स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले.

‘वंदे मातरम्’ या गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी सांगितले की, या गीताने भारतीयांच्या स्वातंत्र्यलढ्यात एकतेचा आवाज बनवला होता. पण पूर्वीच्या सरकारने धार्मिक कारणावरून या गीताचा भाग काढून समाजात फूट पाडली, असे ते म्हणाले.

वसाहतवादी प्रतीके दूर करण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, नौदलाच्या ध्वजावरील ब्रिटिश प्रतीक हटविण्यात आले, राजपथचे नाव ‘कर्तव्य पथ’ करण्यात आले आणि अंदमान बेटांवरील ब्रिटिश नावांच्या जागी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली. राष्ट्रीय युद्धस्मारक उभारून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना योग्य सन्मान मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी भारताच्या एकतेचे चार आधारस्तंभ सांगितले – सांस्कृतिक एकता, भाषिक एकता, भेदभावमुक्त विकास आणि सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटी. त्यांनी बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, सात पवित्र नगरे, आणि शक्तिपीठांची परंपरा ही भारताच्या सांस्कृतिक एकतेची प्रतीके असल्याचे सांगितले. भाषांच्या वैविध्यातून भारताची शक्ती वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी प्रत्येक भारतीय भाषेचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

भेदभावमुक्त विकासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या दशकात सरकारने 25 कोटी नागरिकांना गरीबीतून बाहेर काढले आहे, घरे, पिण्याचे पाणी आणि आरोग्यसेवा उपलब्ध केली आहे. भ्रष्टाचारमुक्त धोरणांमुळे राष्ट्र अधिक एकसंध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून देश एकमेकांशी जोडला जात असल्याचे सांगत त्यांनी वंदे भारत व नमो भारत रेल्वे, नवीन महामार्ग, विमानतळ आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे भारताच्या एकतेला बळ मिळत असल्याचे सांगितले.

भाषणाच्या शेवटी मोदी म्हणाले की, “देशाची सेवा हीच सर्वोच्च उपासना आहे. जेव्हा 140 कोटी भारतीय एकत्र उभे राहतात, तेव्हा पर्वतही बाजूला होतात.” त्यांनी सर्वांना ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पाने प्रेरित होऊन विकसित आणि स्वावलंबी भारत घडविण्याचे आवाहन केले. सरदार पटेलांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande