






- राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींचा अंदाज
मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। मतदारयादीतील घोळ आणि मतचोरीच्या आरोपांवरून आज राजधानी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीकडून 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्र रस्त्यावर उतरले. गेल्या अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधूंची ही ऐतिहासिक एकत्रित उपस्थिती पाहण्यासाठी राजकीय वर्तुळासह नागरिकांची उत्सुकता ताणली गेली होती. दरम्यान विरोधकांची एकजूट असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील बेबनाव समोर आला. कारण काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, सतेज पाटील असे निवडक नेते सोडले, तर प्रदेशाध्यक्षांसह मुंबईतील नेत्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या विराट मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी झाले. निवडणूक आयोगाने मतदारयादीतील घोळ दुरुस्त करेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, ही एकमुखी मागणी या मोर्चातून करण्यात आली. अनेक ठिकाणी एका घरात शेकडो मतदार दिसून येत असल्याचे आणि बोगस नावे मोठ्या प्रमाणात समाविष्ट असल्याचे निदर्शनास आल्याने मतदारयादी स्वच्छ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा लोकल प्रवास केला. जवळपास पंधरा मिनिटे दादर स्थानकावर थांबून त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला, ऑटोग्राफ दिले आणि विंडो सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेतला. या प्रवासादरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. एका प्रवाशाला दिलेला रेल्वे तिकिटावरील राज ठाकरे यांचा ऑटोग्राफ त्या प्रवाशाने फ्रेम करून ठेवण्याची प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, या मोर्चासाठी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली. फॅशन स्ट्रीटपासून निघालेला मोर्चा मुख्यालयावर धडकला तेव्हा लाखो कार्यकर्त्यांनी घोषणा देत मतदारयादीतील अनियमिततेविरोधात आवाज उठवला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे या सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसकडून मनसेसोबतच्या सहभागावर सुरुवातीला मतभेद निर्माण झाले होते, मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेसचे नेतेही मोर्चात सहभागी झाले. बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेते या मोर्चात चालताना दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनीही मोर्चात हजेरी लावली.
मोर्चात सहभागी होताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने मतदारयादीतील चुका त्वरित दुरुस्त कराव्यात, अन्यथा देशभरात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. “निवडणुकीपूर्वी यादीतील सर्व बोगस नावे वगळली नाहीत, तर लोकशाहीवरील विश्वास डळमळेल,” असा इशाराही देण्यात आला.
या 'सत्याच्या मोर्चा'मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्रितपणे निवडणूक आयोगाविरुद्ध उभारलेला हा मोर्चा राज्यातील विरोधी राजकारणासाठी नवा टप्पा ठरणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule