नोव्हेंबरमध्ये बँकांना 11 दिवस सुट्टी
मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑक्टोबर महिना संपताच आता नोव्हेंबर महिना सुरू झाला असून, या महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिन्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 11 दिवस ब
Banks remain closed


मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑक्टोबर महिना संपताच आता नोव्हेंबर महिना सुरू झाला असून, या महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिन्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये रविवार तसेच दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आर्थिक व्यवहारांचं नियोजन आधीच करणं आवश्यक आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्य स्थापना दिनानिमित्त कर्नाटकातील सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहतील. त्याच दिवशी उत्तराखंडमधील डेहराडून येथील बँका इगास-बग्वाल सणामुळे बंद असतील. या सणाला स्थानिक पातळीवर ‘मोठी दिवाळी’ असंही म्हटलं जातं.

5 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रहस पौर्णिमा या सणांमुळे आयझोल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील.

6 नोव्हेंबर रोजी शिलाँगमध्ये नोंगक्रेम नृत्य उत्सवानिमित्त बँकांना सुट्टी असेल, तर 7 नोव्हेंबर रोजी वांगला उत्सवामुळे सर्व बँका बंद राहतील. 8 नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये कनकदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. 11 नोव्हेंबर रोजी सिक्कीममध्ये ल्हाबाब दुचेन या बौद्ध धार्मिक सणानिमित्त बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

याशिवाय साप्ताहिक सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका 2 नोव्हेंबर (रविवार), 8 नोव्हेंबर (दुसरा शनिवार), 9 नोव्हेंबर (रविवार), 16 नोव्हेंबर (रविवार), 22 नोव्हेंबर (चौथा शनिवार), 23 नोव्हेंबर (रविवार) आणि 30 नोव्हेंबर (रविवार) या दिवशी बंद राहतील.

तथापि, बँका बंद असल्या तरी ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार, बिल भरणे, तसेच शिल्लक तपासणी यांसारखी सर्व डिजिटल सेवा पूर्ववतपणे वापरू शकतील. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष बँकेत न जाता अनेक कामं ऑनलाइन पूर्ण करता येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande