
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : मागील काही दिवसांपासून अंजनगाव सुर्जी शहरात आणि परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान अंजनगाव पोलिसांनी चार अट्टल चोरट्यांना पकडून पाच घरफोड्यांचा उलगडा केला आहे. या वेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जुबेरोद्दीन कलिमोद्दीन (२२, उस्मानपुरा) आणि नुरोद्दीन उर्फ मुक्का नजमोद्दीन (२४, काजीपुरा, अंजनगाव सुर्जी) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी या घरफोडीत सहभागी असल्याचे सांगितले. या वेळी चार चोरट्यांकडून पोलिसांनी टीव्ही, सोन्याची पोत, अंगठी, पैंजण, पैंजणाचे तुकडे, कडे तसेच दोन मोबाइल तसेच चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल आणि सुमारे ५७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अंजनगाव पोलिसांनी संतोष भाऊराव शिंदे (३६, मूर्तिजापूर, जि. अकोला) आणि अ. अतिक अ. रफिक (अमरावती) या दोघांना अटक केली होती. त्यांची पोलिस कोठडीही घेतली होती. या दोघांनी अंजनगाव सुर्जी आणि परिसरातील घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणातील एकूण चार घरफोड्यांचा उलगडा झाला असून पाचवा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई अंजनगावचे ठाणेदार सूरज बोंडे, यांच्या मार्गदर्शनात सपोनि सूरज तेलगोटे, जयसिंग चव्हाण, रवी राठोड, मोहसीन पठाण, शुभम मार्कंड, आकाश रंगारी, अमित घाटे, अंकुश सयाम, विशाल थोरात, प्रमोद चव्हाण, दीपाली तेलगोटे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी