
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, 'दिल की बात' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, ते नवा रायपूर अटल नगर येथील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात आयोजित 'जीवनदान' समारंभात जन्मजात हृदयरोगावर यशस्वीरित्या उपचार घेतलेल्या 2500 बालकांशी संवाद साधतील. त्यानंतर, ते 10:45 च्या सुमाराला, ब्रम्हाकुमारींच्या शांती शिखर या आध्यात्मिक अध्ययन, शांतता आणि ध्यानधारणेच्या आधुनिक केंद्राचे उद्घाटन करतील.
त्यानंतर, 11:45 च्या सुमाराला पंतप्रधान नवा रायपूर अटल नगर येथील छत्तीसगड विधानसभेच्या नवीन इमारतीत भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर ते छत्तीसगड विधानसभेच्या नवीन इमारतीला भेट देतील आणि त्याचे उद्घाटन करतील. हरित इमारत संकल्पनेवर बांधण्यात आलेली ही इमारत पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आणि पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या यंत्रणेने सुसज्ज आहे. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.
दुपारी 1:30 च्या सुमाराला, पंतप्रधान शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन करतील आणि त्याची पाहणी करतील. हे संग्रहालय राज्यातील आदिवासी समुदायांचे धैर्य, त्याग आणि देशभक्तीचा वारसा जतन करेल आणि प्रदर्शित करेल. पंतप्रधान यावेळी संग्रहालयाचे पोर्टल आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणाऱ्या आदि शौर्य या ई-पुस्तकाचे प्रकाशन करतील तसेच स्मारकस्थळी शहीद वीर नारायण सिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करतील.
त्यानंतर, दुपारी 2:30 च्या सुमाराला पंतप्रधान छत्तीसगड राज्याच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित छत्तीसगड रजत महोत्सवात सहभागी होतील. पंतप्रधान रस्ते, उद्योग, आरोग्यसेवा आणि ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या 14,260 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास आणि परिवर्तनकारी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
ग्रामीण रोजगारांमध्ये बळकटी आणण्यासाठी पंतप्रधान छत्तीसगडच्या 9 जिल्ह्यांमध्ये 12 नवे स्टार्ट अप ग्राम उद्योजकता कार्यक्रम ब्लॉक्सचे उद्घाटन करतील. बांधकाम पूर्ण झालेल्या 3.51 लाख घरांच्या गृह प्रवेश कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील आणि राज्यभरातील ग्रामीण कुटुंबांसाठी सन्मानपूर्ण निवास व्यवस्था तसेच सुरक्षितता सुनिश्चित करत, पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 3 लाख लाभार्थ्यांना 1200 कोटी रुपयांचा हप्ता जारी करतील.
संपर्क जोडणी सुधारण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांच्या हस्ते पाथलगाव-कुंकुरी ते छत्तीसगड-झारखंड सीमा या टप्प्यातील चौपदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचा कोनशीला समारंभ होईल. भारतमाला परियोजनेअंतर्गत, सुमारे 3,150 कोटी रुपये खर्चून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) हा टप्पा विकसित करण्यात येत आहे. कोरबा, रायगढ, जशपूर, रांची आणि जमशेदपूर या भागांतील महत्त्वाच्या कोळसा खाणी, औद्र्योगिक विभाग आणि पोलाद कारखाने यांना परस्परांशी जोडणारा हा धोरणात्मक मार्गिका टप्पा क्षेत्रीय व्यापारी संबंध अधिक बळकट करणारी आणि मध्य भारताला देशाच्या पूर्व भागाशी एकत्र करणारी मुख्य आर्थिक धमनी म्हणून काम करेल.
त्यासोबतच, पंतप्रधान या दौऱ्यात बस्तर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या विविध भागांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-130डी (नारायणपूर-कस्तूरमेटा-कुटूल-निलांगुर-महाराष्ट्र सीमा)चे बांधकाम तसेच अद्ययावतीकरण कार्याची पायाभरणी करतील. राष्ट्रीय महामार्ग एनएच-130सी (मदंगमुडा-देवभोग-ओदिशा सीमा) चे दुपदरी पेव्ह्ड शोल्डर्स असलेल्या महामार्गाच्या उन्नतीकरण कार्याचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. यामुळे जिल्ह्याच्या आदिवासी तसेच अंतर्गत भागामध्ये रस्त्यांची जोडणी लक्षणीयरित्या सुधारून आरोग्यसुविधा, शिक्षण आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याची चांगली सोय होईल आणि दुर्गम भागातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
विद्युत क्षेत्रासाठी, पंतप्रधान आंतर-क्षेत्रीय ईआर-डब्ल्यू-आर परस्पर जोडणी प्रकल्पाचे उद्घाटन करतील. या प्रकल्पामुळे पश्चिम आणि पूर्व ग्रीड्स दरम्यान आंतर-क्षेत्रीय वीज हस्तांतरण क्षमता 1,600 मेगावॉटने वाढेल आणि त्यामुळे या भागात ग्रीडची विश्वासार्हता सुधारून निश्चित वीजपुरवठ्याची सुनिश्चिती होईल.
यासोबतच, पंतप्रधानांच्या हस्ते उर्जा क्षेत्रातील 3,750 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी होईल. छत्तीसगड राज्यातील उर्जाविषयक पायाभूत सुविधा बळकट करणे, वीजपुरवठ्याची विश्वासार्हता सुधारणे आणि पारेषण क्षमता सुधारणे हा या प्रकल्पांचा उद्देश आहे.
सुधारित वितरण क्षेत्र योजने (आरडीएसएस) अंतर्गत पंतप्रधान सुमारे 1,860 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण करतील. ग्रामीण तसेच कृषी क्षेत्राचा वीज पुरवठा सुधारण्यासाठी नव्या वीजवाहिन्यांची उभारणी, फीडर विभाजन, ट्रान्सफॉर्मर्स बसवणे,कंडक्टर्स चे रूपांतरण तसेच कमी दाबाच्या नेटवर्क्सचे बळकटीकरण इत्यादी कार्यांचा यात समावेश आहे. पंतप्रधान रायपुर, विलासपूर, दुर्ग, बेमेतारा, गरियाबंद आणि बस्तर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नव्या वीज उपकेंद्रांचे उद्घाटन देखील करतील.
या प्रकल्पामुळे 15 लाखाहून अधिक नागरिकांना फायदा होणार असून त्यांना स्थिर व्होल्टेज मिळेल, वीज पुरवठा खंडित होणे कमी होईल तसेच दुर्गम आणि आदिवासी भागातही विश्वासार्ह वीज पुरवठा होईल. याव्यतिरिक्त, 1,415 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन सबस्टेशन आणि ट्रान्समिशन प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, यात कांकेर आणि बालोदाबाजार-भाटापारा येथील प्रमुख सुविधांसह, राज्यातील विविध जिल्ह्यात सुरू होणाऱ्या सुधारित वितरण क्षेत्र योजना (आर डी एस एस) कामांचा समावेश आहे ज्यामुळे वीज पुरवठ्याचा विस्तार आणि गुणवत्ता दोन्ही वाढतील.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात, पंतप्रधान रायपूर येथे एचपीसीएलच्या अत्याधुनिक पेट्रोलियम ऑइल डेपोचे उद्घाटन करतील, जो 460 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून बांधला गेला आहे आणि त्याची पेट्रोल, डिझेल आणि इथेनॉलसाठी साठवण क्षमता 54,000 किलोलिटर इतकी आहे. ही सुविधा एक प्रमुख इंधन केंद्र म्हणून काम करेल, ही सुविधा छत्तीसगड आणि शेजारी राज्यांमध्ये अखंड इंधन पुरवठा सुनिश्चित करणारे एक प्रमुख इंधन केंद्र ठरेल. यामध्ये 10,000 किलोलिटर इथेनॉल साठवण असल्यामुळे हा डेपो इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाला देखील चालना देईल, ज्यामुळे जीवाश्म इंधनवरील अवलंबित्व कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जा विकासाला प्रोत्साहन मिळेल.
पंतप्रधान सुमारे 1950 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 489 किमी लांबीच्या नागपूर-झारसुगुडा नैसर्गिक वायू पाईपलाईनचे देखील लोकार्पण करतील. हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा 15% पर्यंत वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल असून एक राष्ट्र, एक गॅस ग्रिड या दृष्टिकोनाची पूर्तता करतो. ही पाईपलाईन छत्तीसगडमधील 11 जिल्ह्यांना राष्ट्रीय गॅस ग्रिडशी जोडेल, सोबतच औद्योगिक विकासाला चालना देईल तसेच या प्रदेशाला स्वच्छ आणि परवडणारे इंधन उपलब्ध करून देईल.
औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी, पंतप्रधान दोन स्मार्ट औद्योगिक क्षेत्रांची पायाभरणी करतील, त्यापैकी एक जांजगीर-चंपा जिल्ह्यातील सिलादेही-गटवा-बिरा येथे आणि दुसरे राजनांदगाव जिल्ह्यातील बिजलेटला येथे उभारण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, पंतप्रधान नवा रायपूर अटल नगर येथील सेक्टर-22 येथे फार्मास्युटिकल पार्कची पायाभरणी करतील. हे पार्क औषध आणि आरोग्य विषयक उत्पादनांसाठी समर्पित क्षेत्र म्हणून काम करेल.
आरोग्यसेवा क्षेत्राला चालना देण्यासाठी, पंतप्रधान मनेंद्रगड, कबीरधाम, जांजगीर-चंपा आणि गीदम (दंतेवाडा) येथे पाच नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि बिलासपूर येथील सरकारी आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमुळे छत्तीसगडमध्ये वैद्यकीय शिक्षणाला बळ मिळेल, आरोग्य सेवा अधिक व्यापक होईल आणि पारंपरिक चिकित्सा पद्धतीला प्रोत्साहन मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी