
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरिता व केस डायरी सोयीची करून देण्याकरिता २० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अंमलदाराला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.३०) सायंकाळी अटक केली. अब्दुल रहीम अब्दुल कदीर (वय ५४, रा. जाकीर कॉलनी) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.तक्रारदाराविरुध्द भातकुली पोलीस ठाण्यात गुन्ह्यात दाखल आहे. याप्रकरणात तक्रारदाराने न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळविला होता. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या भावाला अटक केली होती. त्यानंतर तपास अधिकाऱ्याने तक्रादाराला तपासात मदत करण्याकरिता व केस डायरी सोयीची करून देण्याकरिता ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराने २० हजार रुपये देण्यास कबुल केले. तसेच तपास अधिकाऱ्याला १० हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम तक्रादाराला द्यायची नव्हती. त्यामुळे त्याने ११ ऑगस्ट २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रथम पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी पोलीस अंमलदार अब्दुल रहीम अब्दुल कदीर याने तक्रारदाराला गुन्ह्यात मदत करण्याकरिता २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न होताच त्याला अटक केली. याकारवाईत पोलीस निरीक्षक प्रवीण वेरूळकर, पोलीस अंमलदार डिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, किशोर पवार, गोपाल किरडे आणि सलीम खान यांचा समावेश होता. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी