धामणगावात पहिल्यांदाच आरोपींची पायी वरात
अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.) येथील गजबजलेल्या शास्त्री चौकात कधी शाळकरी मुलीची छेड असो वा बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण असो हे प्रकार वाढतच होते. मध्यंतरी एका शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या मजनूला पोलिसांनी घटनास्थळावरच प्रसाद दिल्याची घ
धामणगावात पहिल्यांदाच आरोपींची पायी वरात


अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)

येथील गजबजलेल्या शास्त्री चौकात कधी शाळकरी मुलीची छेड असो वा बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण असो हे प्रकार वाढतच होते. मध्यंतरी एका शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या मजनूला पोलिसांनी घटनास्थळावरच प्रसाद दिल्याची घटना घडली होती. मात्र त्यानंतर काही टपोरींचे कारनामे थांबायचे नाव घेत नव्हते. अशातच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना स्थानिक शास्त्री चौकात घडली. त्यानंतर पोलिसांनी एका महिलेसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांची शहरातून पायी वरात काढली.

जतिन विक्की सोत्रे (१९), गौरव उर्फ युग विक्की सोत्रे (२०), रितिक मोहन चावरे (२०), विक्की मंगल सोत्रे (४८), वेदांत संतोष चावरे (२०), मोहन मदन चावरे (५०) तसेच एक महिला असे अटक करण्यात आलेल्या आरोर्पीची नावे आहेत. पोलीस कर्मचारी उमेश आसाराम यादव हे आपले पोलीस सहकारी सचिन हुकूम यांच्यासह ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.४५ ते १० च्या दरम्यान साध्या पोशाखात पेट्रोलिंग करीत होते. स्थानिक शास्त्री चौकात आरोपी हे एका शाळकरी मुलाला मारहाण करीत असताना दिसले.

हे भांडण सोडविण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले व त्यांनी आपण पोलीस असल्याची ओळख दिली. परंतु जतिन विक्की सोत्रे व गौरव उर्फ युग विक्की सोत्रे हे काही मानायला तयार नव्हते. तुम बीचमें मत आओ, हम पुलिस को नही मानते म्हणत मारहाण सुरु केली. यावेळी प्रकरणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करीत असताना उर्वरित आरोपींनी महिलेला सोबत आणले आणि त्या महिलेने थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या गालावर थापड मारली. तू पोलीस असला तर काय झालं मी तुला खोट्या गुन्ह्यात फसविन अशी धमकी दिली. प्रकरण उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताबाहेर जात असताना त्यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यातून अधिक कर्मचारी बोलावून घेतले. सातही आरोपींना ताब्यात घेऊन शास्त्री चौक ते दत्तापूर पोलीस ठाण्यापर्यंत त्यांची पायी वरात काढण्यात आली. धामणगाव शहरात असा प्रकार पहिल्यांदाच पहायला मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande