धाराशिव, 6 ऑक्टोबर (हिं.स.) कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तेरणा नदीच्या पाणी पातळीत धोकादायक वाढ झाली. रत्नापूर आणि परिसरातील गावांमध्ये नदीचे पाणी शिरले असून, नदीकाठच्या पिकांसह सुपीक जमीनही वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांची उभी पिके डोळ्यादेखत नष्ट झाली आहेत, तर कित्येकांची जमीन नदीच्या पात्रात विलीन झाली आहे, ज्यामुळे जमिनीच्या मूळ हद्दीच नष्ट झाल्या आहेत.
तालुक्यातील रत्नापूर परिसरातून वाहणाऱ्या तेरणा नदीला प्रचंड महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे. या महापुराच्या प्रलयामुळे नदीकाठची संपूर्ण शेतजमीन खरवडून वाहून गेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या अनपेक्षित संकटामुळे नदीकाठचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आमची सगळी जमीन वाहून गेली, आता आम्ही काय करायचं आणि जगायचं कसं? असा संतप्त सवाल स्थानिक शेतकरी विचारत आहेत.प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis