लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)लातूर ग्रामीण पोलीसांनी सराईत गुन्हेगार शक्ती उर्फ योगेश अशोक गुरणे आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.देवगिरी बार, औसा रोड येथे अविनाश बोयणे याला हप्ता न दिल्याच्या कारणावरून आरोपी शक्ती गुरणे, इस्माईल शेख, किशोर मस्के, आकाश सकट आणि इतरांनी लोखंडी कत्ती व खुर्च्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तपासात आरोपींकडून लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली. संबंधित टोळीवर दरोडा, खंडणी, जबरी चोरी व हत्यारांनी हल्ला अशा स्वरूपाचे ११ गंभीर गुन्हे पूर्वीच नोंद आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) नुसार ८६० पानांचे दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालय, लातूर येथे दाखल करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी साहेबराव नरवडे आणि पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या तपासात पोलीस अधिकारी बाळासाहेब डोंगरे, भगवान मोरे तसेच अंमलदार वाजीद चिकले, अंबादास पारगावे यांनी विशेष कामगिरी बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis