अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
कोविड-१९ महामारीच्या काळात राज्य शासनाच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील काही बंदींना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले होते. महामारी ओसरल्यानंतर बरेचसे बंदी कारागृहात परत हजर झाले असले, तरीही १२८ बंदी अजूनही परतलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने शहर पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून संबंधित बंद्यांचा शोध घेण्याची विनंती केली आहे.मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने कारागृहातील बंद्यांचा आरोग्यधोका लक्षात घेऊन काही न्यायाधीन बंदींना तात्पुरत्या जामिनावर मुक्त केले होते. अमरावती कारागृहातूनही अशा प्रकारे काही बंदींना सोडण्यात आले. या काळात कारागृहात अनेक बंदी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने बंद्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलले होते.महामारी कमी झाल्यानंतर सोडलेल्या बंदींना परत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. काही बंदी परत आले असले, तरी १२८ बंदी अद्याप कारागृहात परतले नाहीत. यामुळे कारागृह प्रशासनाने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून त्या बंद्यांची यादी सोबत दिली आहे. संबंधित बंदी कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात, याबाबत माहिती घेऊन पोलीस लवकरच त्यांच्या अटकेसाठी कारवाई करणार आहेत.या प्रकरणामुळे कारागृह प्रशासन आणि पोलीस विभागासाठी अडचणी वाढल्या असून, फरार बंद्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना पुन्हा कारागृहात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी