छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसला. पहाटे चार वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत पावसाने अनेक गावे झोडपून काढली. विशेषतः परभणी जिल्ह्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली आहे अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने पाऊस मुसळधार पडेल असा अंदाज दिला होता.
परभणी पाठोपाठ धाराशिव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.बीड जिल्ह्याच्या काही भागातही पावसाची नोंद झाली आहे.परभणीत अतिवृष्टी झाल्याची माहिती असून सखल भागात घराघरांमधून पाणी शिरले आहे शेकडो कुटुंबांना तडाखा बसला असल्याचे सांगण्यात आले आहे.सोमवारी पहाटे चार ते पाचच्या सुमारास परभणी शहरासह परिसरास मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले. पहाटेच्या या पावसामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली.या पावसाने सखल भाग पूर्णतः जलमय झाला, विशेषतः चोहोबाजूंच्या वसाहतीतील सखल भागातील घराघरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे कुटुंबीयांना तडाखा बसला. मध्यवस्तीसह चौहो बाजूचे रस्ते चौक हे गुडघ्या एवढ्या पाण्याखाली आहेत. दरम्यान ठिकठिकाणी कुटुंबीयांनी महानगरपालिका, अग्निशामक दल, व पोलीस प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली .
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis