पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी महापालिका निवडणुकीत ‘शत प्रतिशत भाजप’साठी अन्य पक्षांतील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी दारे उघडी करणाऱ्या भाजपला आता पक्षांतर्गत विरोधामुळे काही काळासाठी ‘प्रवेश’द्वार बंद करण्याची वेळ आली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेनंतर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाची शिस्त आणि महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली जाण्याच्या भीतीपोटी आतापर्यंत कोणीच उघडपणे विरोधाची भूमिका घेतली नव्हती. मात्र, आता काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांना पत्र देऊन विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना पक्षातील अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी काही काळासाठी भाजपने ‘प्रवेश’द्वार बंद केल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु