सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
सप्टेंबरमधील महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १०८ गावांमध्ये पाणी शिरले होते. नदी काठावरील ११ हजार ८०५ कुटुंबांचा संसार पुरात वाहून गेला. या पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी आनंदात जावी म्हणून त्यांना शासनाकडून २५ वस्तूंचे दिवाळी कीट मिळणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे चार लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरूच असून पंचनामे पूर्ण होऊन नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल. त्यानंतर शासनाकडून मदत मिळायला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी, १८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. १८ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबरला दीपावली पाडवा आणि २३ ऑक्टोबरला भाऊबीज आहे.
दिवाळीपूर्वी बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर करून सर्वांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळीसाठी आधार म्हणून २५ वस्तूंचे किट दिले जाणार आहे. त्यात तांदूळ सोडून सणाला लागणाऱ्या बाकीच्या सर्व वस्तू त्यात असणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड