सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। माढा तालुक्यातील माढा - वैराग रस्त्यावरील केवड येथील सीना नदीवरील पूल पुराच्या पाण्यामुळे चौथ्यांदा पाण्याखाली गेला असून हा पूल २० दिवसांपेक्षा अधिक दिवस पाण्याखाली राहिला आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे या अगोदरच हा पूल तीन वेळा पाण्याखाली गेला होता. रविवारी रात्री माढा, बार्शी या सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला. शिवाय सीना कोळेगाव धरणातून सोडलेले पाणी, बेंद ओढ्याला आलेले पाणी, यामुळे माढा - वैराग रस्त्यावरील केवड येथील हा पूल पुन्हा पाण्याखाली गेला. यामुळे माढा - वैराग वाहतूक बंद राहील. नुकताच पूर ओसरला होता व शेतकऱ्यांच्या शेतातील पाणीही कमी झाले होते. मात्र आता चौथ्यांदा पुन्हा पूर आल्याने नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली गेलेली आहे. सततच्या पुरामुळे या भागातील ग्रामस्थ शेतकरी वर्ग हा धास्तावलेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड