सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। अरबी समुद्रातील शक्ती चक्रिवादळाचा परिणाम सोलापूर व शेजारच्या जिल्ह्यांवर दिसू लागला आहे. सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील धाराशिव, बीड, अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातही माढा, मोहोळ, बार्शी तालुक्यात मध्यम पाऊस झाला. नेहमीच्या तुलनेत आज सोलापूरच्या तापमानातही घट झाली आहे. शनिवारी ३२.४ तर आज ३१.३अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारच्या तुलनेत आज १.१ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. सीना कोळेगावच्या पाणलोटातील आष्टी तालुक्यात १०.८, अहिल्यानगर तालुक्यात १६.२, कर्जत तालुक्यात ९.८, जामखेड तालुक्यात २४.५, भूम तालुक्यात ३८.० तर परंडा तालुक्यात सरासरी ७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सीना नदीच्या परिसरातील माढा तालुक्यात ७.६ तर मोहोळ तालुक्यात ५.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शेजारच्या जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सीना कोळेगाव प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला आहे. या प्रकल्पातून सीना नदीत २४ हजार ७०० क्युसेक पाणी सोडले जात होते. या पाण्यात आज सकाळी वाढ करून २८ हजार ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड