‘टीईटी’शिवाय आता शिक्षकांना पदोन्नती नाहीच
सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता ‘टीईटी’
school


सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता ‘टीईटी’ उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारीपदी पदोन्नती मिळणार आहे. पदोन्नतीस पात्र असूनही ते शिक्षक ‘टीईटी’ उत्तीर्ण नसल्यास त्यांना पदोन्नती मिळणार नाही.

केंद्रप्रमुखांची ५० टक्के पदे सरळसेवा पद्धतीने आणि ५० टक्के पदे पदोन्नतीने भरली जातात. विस्ताराधिकाऱ्यांच्या पदभरतीसाठीही अशीच पद्धती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नीतून मुख्याध्यापक होण्यासाठी देखील ‘टीईटी’ची अट पूर्ण करावी लागणार आहे. न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या आदेशानंतर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकाऱ्यांच्या पदोन्नती थांबल्या आहेत.

काही शिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. त्यावर आगामी काळात शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांकडून मार्गदर्शक सूचना येतील, त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही होणार आहे. तत्पूर्वी, पदोन्नतीची कार्यवाही थांबलेलीच राहणार आहे. ‘टीईटी’ उत्तीर्ण असलेल्यांनाच पदोन्नती मिळणार असल्याने जे सध्या टीईटी उत्तीर्ण असतील त्यांनाच त्याचा लाभ होईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande