उदगीरची 'सद्भावना मानवी साखळी' ठरली ऐतिहासिक
लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)उदगीर शहरात सद्भावना मंचतर्फे आयोजित केलेली “सद्भावना मानवी साखळी” ही केवळ एक सामाजिक उपक्रम नव्हे, तर मानवतेचा, बंधुत्वाचा आणि परस्पर प्रेमाचा सजीव संदेश ठरली. हुतात्मा स्मारक रस्त्यालगत उभी राहिलेली ही साखळी उ
अ


लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)उदगीर शहरात सद्भावना मंचतर्फे आयोजित केलेली “सद्भावना मानवी साखळी” ही केवळ एक सामाजिक उपक्रम नव्हे, तर मानवतेचा, बंधुत्वाचा आणि परस्पर प्रेमाचा सजीव संदेश ठरली. हुतात्मा स्मारक रस्त्यालगत उभी राहिलेली ही साखळी उदगीरच्या सामाजिक ऐक्याचा आणि लोकसहभागाचा सुंदर नमुना ठरली.

या उपक्रमात सद्भावना मंचच्या शंभरहून अधिक सदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, वयोवृद्ध नागरिकांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. या वयस्कर व्यक्तींनी ज्या जोमाने आणि हसऱ्या चेहऱ्याने हातात हात घालून मानवी साखळी पूर्ण केली, त्याने तरुण पिढीलाही प्रेरणा दिली.

संपूर्ण कार्यक्रमात एकूण 17 मोठे बॅनर उभारण्यात आले होते, ज्यावर सद्भावनेचे विविध संदेश झळकत होते — “वसुधैव कुटुंबकम्”

“पृथ्वीवर दया करा, आकाशवाला तुमच्यावर दया करेल”

“भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत”

“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे”

“द्वेष टाळा, प्रेमाचा प्रसार करा”

हा कुणाचा, हा कुणाचा, असे नच म्हणावे. हा आमूचा, हा आमूचा असेची वदवावे.

द्वेशाच्या भिंती पाडून प्रेमाचे फुल बांधूया. संपूर्ण जग एकाच ईश्वराचे परिवार आहे.

या घोषवाक्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि अनेकांच्या मनात एकतेचा, परस्पर सन्मानाचा आणि सौहार्दाचा भाव निर्माण केला.

उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली . कार्यक्रमादरम्यान मंचाच्या स्वयंसेवकांनी माइकद्वारे नागरिकांना एकतेसाठी आणि मानवतेसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. एकतेवर आधारित गीत गायीले.हुतात्मा स्मारकाजवळ उभी असलेली ही मानवी साखळी काही काळासाठी संपूर्ण रस्त्यावर एक प्रेमाचा आणि आपुलकीचा संदेश देणारे दृश्य बनली. ये-जा करणाऱ्या नागरिकांना सद्भावनेची पत्रके वाटप करून बंधुभाव, प्रेम आणि शांततेचा संदेश दिला गेला. विशेष म्हणजे याप्रसंगी छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या मानवी साखळीत सहभाग नोंदवून सहकार्य केले. या उपक्रमाने उदगीर शहरात एक नवा सामाजिक संदेश दिला आहे.

या उपक्रमात सद्भावनामाचेचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, सचिव डॉ. शेख मोहम्मद असग़र, उपाध्यक्ष बिरादार विश्वनाथ, मुजीब ख़तीब, डॉ. बळीराम भुक्तरे, उपस्थित होते. या सद्भावना मानवी साखळीच्या शेवटी अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी सर्व उपस्थित आमचे आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande