नांदेड, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। नांदेड शहरातील पिरबुर्हान गल्ली क्र.१२, भाग्यनगर परिसरात घडलेल्या बालकाच्या अपहरणाच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. परंतु, भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या चमूने केवळ २४ तासांच्या आत अपहरण झालेल्या दीड वर्षांच्या मुलाचा शोध घेऊन त्यास सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले आहे.
घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, नुरी चौक येथील महिला फिर्यादी यांच्या दीड वर्षांच्या मुलाचे दोन अनोळखी इसमांनी पल्सर मोटारसायकलवरून अपहरण केले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३४/२०२५ कलम १३७(२), ३(५) बीएनएस-२०२३ कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ तपास पथक तयार करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील,अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जलदगतीने सुरू करण्यात आला. पथकातील अधिकारी व अंमलदारा सीसीटीव्ही फुटेज तपासून व गुप्त बातमीदारांच्या मदतीने अपहरणकर्त्यांचा शोध घेतला. माहिती मिळाल्यावर खडकपूरा सैलाबनगर परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना पकडण्यात आले, तसेच अपहरण झालेल्या बालकास सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे १,५०,०००/- इतकी आहे. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन बालकास केवळ २४ तासांच्या आत सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis