वॉशिंग्टन , 9 ऑक्टोबर (हिं.स.)।“शांतीचा नोबेल पुरस्कार” मिळवण्याची इच्छा अनेकदा जाहीर करणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रतिष्ठित पुरस्काराच्या घोषणेच्या एक दिवस आधीच वातावरण तयार करायला सुरुवात केली आहे. गाझामधील एका मोठ्या घडामोडीमुळे त्यांच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
गाझामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांच्या 20 बिंदूंवरील शांती योजनेचा पहिला टप्पा आता लागू झाला आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले की इस्रायल आणि हमास, हे दोन्ही गट गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली लढाई थांबवण्यासाठी त्यांच्या शांती योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमत झाले आहेत.या घोषणेनंतर व्हाईट हाऊस आणि रिपब्लिकन पार्टीकडून ट्रम्प यांना “शांतीदूत”आणि “शांततेचे अध्यक्ष”म्हणून सादर करणारे पोस्ट्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. व्हाईट हाऊसकडून एक प्रचार मोहीम राबवली जात आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हाईट हाऊसने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या कॉरिडॉरमधून चालताना दिसतात आणि त्या फोटोवर लिहिलं आहे – “द पीस प्रेसिडेंट”. केवळ व्हाईट हाऊसच नाही, तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीने आपल्या हँडलवरून एक पोस्ट केली आहे ज्यात ट्रम्प “मेक अमेरिका ग्रेट अगेन” ही टोपी घालून एका खुर्चीवर बसलेले आहेत, आणि फोटोवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे – “द पीस मेकर”.
तथापि, गाझामध्ये अद्याप शांती प्रस्थापित झालेली नाही. ट्रम्प यांच्या शांती योजनेच्या फक्त पहिल्या टप्प्यावर सहमती झाली आहे.अलीकडेच ट्रम्प यांनी दावा केला होता की त्यांनी जगातील सात मोठ्या संघर्षांचा शेवट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे, जर त्यांना नोबेल शांतता पुरस्कार दिला गेला नाही, तर ती अमेरिका साठी एक मोठी अपमानास्पद गोष्ट ठरेल, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार म्हटलं आहे की त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवले आहेत आणि त्यामुळे ते या पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र, अनेक तज्ज्ञ अद्याप या मताशी सहमत नाहीत.
अहवालानुसार, ओस्लो येथील पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रमुख नीना ग्रेगर यांनी सांगितले की, “गाझामध्ये शांती प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांव्यतिरीक्त, ट्रम्प यांची काही धोरणं अशी आहेत जी अल्फ्रेड नोबेल यांच्या मूळ उद्दिष्टांशी आणि त्यांच्या वसीयतिच्या तत्त्वांशी विरोधात जातात — विशेषतः आंतरराष्ट्रीय सहकार्य, राष्ट्रांमध्ये बंधुत्व, आणि शस्त्रास्त्रांचा नाश या बाबतीत.”
ओस्लोस्थित नॉर्वेजियन नोबेल समिती शुक्रवार (10 ऑक्टोबर) रोजी विजेत्याची घोषणा करणार आहे आणि त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode