- पहिल्या महिला शाखेच्या स्थापनेची घोषणा
इस्लामाबाद, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांची कटकारस्थाने रचणारा जैश-ए-मोहम्मद (जेइएम) ही संघटना पुन्हा एकदा आपली सक्रियता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेने आपल्या पहिल्या महिला शाखेच्या स्थापनेची घोषणा केली आहे.जागतिक दहशतवादी मौलाना मसूद अझहरच्या नावाने जारी केलेल्या पत्रातून ही माहिती समोर आली आहे.
पत्रानुसार, या नवीन युनिटसाठी भरती प्रक्रिया ८ ऑक्टोबरपासून पाकिस्तानातील बहावलपूर येथील मरकझ उस्मान-ओ-अली येथे सुरू झाली आहे. बुधवारी जमात-उल-मोमिनात या नावाने महिला शाखेची स्थापना करून जैशने आपली नवी रणनीती जाहीर केली. आधी या संघटनेत महिलांची भरती निषिद्ध होती, पण आता महिलांची भरती सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या महिला शाखेचे नेतृत्व मसूद अझहरची बहीण सादिया अझहर करणार आहे. विशेष म्हणजे, सादिया अझहरचा पती यूसुफ अझहर हा ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराच्या कारवाईत ठार मारला गेला होता. तो जैश-ए-मोहम्मदच्या मरकज सुभानअल्लाह या मुख्यालयाशी संबंधित होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संघटनेने आता कमांडरांच्या पत्नींसोबतच बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरिपूर आणि मनसेहरा येथील केंद्रांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांची भरती सुरू केली आहे. या महिला दहशतवाद्यांचा वापर आत्मघाती हल्ल्यांमध्ये केला जाऊ शकतो अशी भीती मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले होते. मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील या दहशतवादी गटाने यापूर्वी महिलांना कधीही सशस्त्र किंवा युद्धसंबंधित मोहिमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, आता संघटना या धोरणात मोठा बदल करत असल्याचे दिसून येते. मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तल्हा अल-सैफ यांनी महिलांना संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. ही घडामोड भारताच्या दृष्टीने सतर्कतेची गरज निर्माण करणारी आहे, कारण महिला दहशतवाद्यांची भरती ही नव्या स्वरूपाचा धोका ठरू शकते.
आयसिस, बोको हराम, हमास आणि एलटीटीई सारख्या संघटनांनी महिलांना आधीच सामील करून घेतले आहे. मात्र, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा (LeT) यांसारख्या संघटनांनी याआधी महिलांना सहभागी होण्याची परवानगी दिली नव्हती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode