

श्रीहरिकोटा, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) उद्या, 2 नोव्हेंबर 2025 रोजी देशातील सर्वांत वजनदार लष्करी संचार उपग्रह सीएमएस-03 (जीसॅट-7आर) अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. भारतीय नौदलासाठी विशेषतः विकसित करण्यात आलेला हा बहु-बँड उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून देशाच्या सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक यान एलव्हीएम3 (लॉंच व्हेइकल मार्क-3) च्या सहाय्याने सायंकाळी अंदाजे 5:26 वाजता झेपावणार आहे.
सुमारे 4,410 किलो वजनी असलेला सीएमएस-03 हा भू-स्थिर हस्तांतरण कक्षेत (जीटीओ) भारतीय भूमीतून प्रक्षेपित होणारा सर्वांत जड संचार उपग्रह ठरणार आहे. इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, “उद्या आम्ही LVM3 M5/CMS-03 मोहिमेचं प्रक्षेपण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. उपग्रहासह संपूर्ण वाहन प्रक्षेपणासाठी सज्ज असून, श्रीहरिकोटात अंतिम तयारी सुरू आहे.”
सीएमएस-03 उपग्रह सी, विस्तारित सी आणि क्यू बँडमध्ये कार्यरत राहणार असून, तो भारतीय भूभागासह विस्तीर्ण समुद्री क्षेत्रात आवाज, डेटा आणि व्हिडिओ संचारासाठी ट्रान्सपॉंडर सुविधा देईल. या उपग्रहामुळे भारतीय नौदलाच्या दूरस्थ समुद्री क्षेत्रांमधील संचार नेटवर्क अधिक सुरक्षित, वेगवान आणि स्थिर होणार आहे. 2013 मध्ये प्रक्षेपित झालेल्या जीसॅट-7 ‘रुक्मिणी’चा हा सुधारित उत्तराधिकारी असून, त्यात नव्या पिढीचे पेलोड्स आणि अधिक क्षमतेची बँडविड्थ उपलब्ध आहे.
एलव्हीएम3 या यानाद्वारे होणारे हे प्रक्षेपण इस्रोसाठी विशेष ठरणार आहे. तीन-स्टेज असलेल्या या रॉकेटची उंची 43.5 मीटर असून, एकूण वजन 640 टन आहे. याच्या दोन भव्य सॉलिड बूस्टर्स, द्रव कोर स्टेज आणि स्वदेशी विकसित क्रायोजेनिक स्टेजच्या मदतीनं हे यान 4,000 किलोपेक्षा अधिक वजनाचा उपग्रह भू-स्थिर कक्षेत पोहोचवू शकतं. एलव्हीएम3 यानानं यापूर्वी चंद्रयान-3 आणि वनवेबसारख्या आंतरराष्ट्रीय मोहिमांचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.
सीएमएस-03 उपग्रह भारतीय नौदलाच्या जहाजे, पाणबुड्या आणि किनारी तळांमधील संचार अधिक सक्षम करणार असून, रणनीतिक ऑपरेशन्ससाठी मजबूत नेटवर्क निर्माण करेल. या उपग्रहामुळे नौदलाच्या समुद्री देखरेख, डिजिटल संपर्क आणि आपत्कालीन संप्रेषण क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. त्याचबरोबर काही नागरी संस्थांनाही त्याच्या सेवांचा लाभ मिळणार असल्याने देशातील दुर्गम भागांमधील डिजिटल संपर्क सुधारेल.
दरम्यान, इस्रो लवकरच अमेरिकन कंपनी एएसटी स्पेसमोबाईलच्या 6.5 टन वजनी ब्लूबर्ड-6 उपग्रहाचं प्रक्षेपण देखील करणार आहे. हा उपग्रह वर्षअखेरपर्यंत एलव्हीएम3 द्वारे अवकाशात पाठवण्याची योजना आहे.
सीएमएस-03 मिशनचं यश इस्रोच्या संचार उपग्रह तंत्रज्ञानातील आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. चंद्रयान-3, आदित्य-एल1 आणि इतर यशस्वी मोहिमांनंतर भारत आता संरक्षण आणि संचार क्षेत्रातही अधिक आत्मनिर्भर बनत आहे. उद्याचं प्रक्षेपण देशाच्या अंतराळ इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule