
शासकीय कार्यक्रमांमध्ये ‘नंदिनी’ डेअरी उत्पादने अनिवार्य
बंगळुरू, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व शासकीय विभागांना प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याऐवजी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर शासकीय कार्यालये आणि कार्यक्रमांमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय राज्याच्या पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शासकीय बैठका आणि सचिवालयांमध्ये ‘नंदिनी’ डेअरीचे उत्पादने अनिवार्यपणे वापरण्याचे आदेश दिले आहेत. ‘नंदिनी’ ही कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ) अंतर्गत कार्यरत एक सरकारी संस्था आहे.गेल्या 28 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे की, कर्नाटकातील सर्व शासकीय कार्यालये आणि अधिकृत बैठकींमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत. आता या उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जावी.या निर्णयामुळे प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण मिळेलच, तसेच स्थानिक इको-फ्रेंडली उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात सर्व शासकीय बैठका, कार्यक्रम आणि सचिवालयांमध्ये ‘नंदिनी’च्या उत्पादनांचाच वापर केला जाईल, ज्यामुळे स्थानिक उद्योगांना बळकटी मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.
-------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी