
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर (हिं.स.) -
भारतीय नौदलातर्फे कर्नाटकच्या नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग यांच्या अधिपत्याखाली कारवारमध्ये आयएनएस कदंबा या जहाजावर नवे भरती केंद्र उभारण्यात आले आहे. या नव्या भरती केंद्राच्या स्थापनेसह, आयएनएस कदंबा ही भारतीय नौदलाची संपूर्ण भारतभरातील 10 वी भरती आस्थापना झाली आहे.
या पहिल्याच अग्निवीर तुकडीची दुसऱ्या टप्प्यातील भरती 10 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. कार्मिक शाखा/नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालय आणि मुंबईतील दक्षिणी नौदल कमांड यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.
सुरळीत आणि यशस्वी पद्धतीने भरती अभियानाची अंमलबजावणी होणे सुनिश्चित करण्यासाठी, लॉजिस्टिक्स आणि वैद्यकीय मदतीसह व्यापक प्रशासकीय व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्याही अनुचित प्रसंगाशिवाय होण्याची खातरजमा करून घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी प्रभावी संपर्क आणि समन्वय स्थापित करण्यात आला आहे.
हा उपक्रम पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावरील भरतीविषयक संस्थांमध्ये आणखी एका संस्थेची भर घालत असल्यामुळे तो एक महत्वाचा टप्पा ठरल आहे. स्थानिक जनतेशी असलेले नाते बळकट करण्यासोबतच हा उपक्रम कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा या भागांतील तरुणांना भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट होऊन अभिमान तसेच सन्मानासह देशसेवा करण्याचा मार्ग देखील पुरवतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी