
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभेच्या निकालांनंतर राजकीय वातावरण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तीव्र टीका करत “काँग्रेसमध्ये आणखी एक फूट पडण्याची शक्यता” असल्याचा दावा केला. बिहारमध्ये एनडीएने मिळवलेल्या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, बिहारच्या जनतेने विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केले. रेकॉर्ड मतदानाची मी लोकांना विनंती केली होती, आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने सर्व विक्रम मोडले. एनडीएला प्रचंड विजय देऊन बिहारच्या लोकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास पुन्हा सिद्ध केला.बिहारच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. याच निकालाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसच्या कामकाजावर कठोर टीका केली.
“काँग्रेसचा आधार नकारात्मक राजकारण”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या सहा राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागांपेक्षा बिहारमध्ये भाजपने एकहाती जास्त जागा जिंकल्या.त्यांच्या मते काँग्रेसचे राजकारण सध्या पूर्णपणे नकारात्मकतेवर आधारित आहे ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा, संसदेच्या कामकाजात अडथळे, ईव्हीएमवर वारंवार आरोप, निवडणूक आयोगावर टीका, देशविरोधी अजेंडा पुढे नेणे अशा गोष्टीतच काँग्रेस धन्यता मानते काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टिकोन उरलेला नाही. आज ती मुस्लीम लीगी-माओवादी कॉंग्रेस बनली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
“काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट वाढू शकते
काँग्रेसच्या नकारात्मक भूमिकेमुळे पक्षाच्या आत वेगळा प्रवाह तयार होत असल्याचा दावा करत मोदी म्हणाले की, या नकारात्मक धोरणांमुळे काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होण्याचीही शक्यता आहे. तसेच काँग्रेसवर सहकारी पक्षांना “गिळून टाकण्याचा” आरोप करत ते म्हणाले की, काँग्रेसच्या नावदारांच्या धोरणांमुळे मित्रपक्षही बुडतात.
बिहारच्या विकासाबाबत आश्वासन
एनडीएच्या विजयामुळे आता बिहारच्या विकासाची जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, बिहारमध्ये उद्योग, रोजगार आणि पर्यटन वाढीस नवे दार उघडतील, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन केले जाईल, बिहारची प्रतिभा देश-विदेशात अधिक उजळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच बिहारच्या जनतेने विकासविरोधी आणि घराणेशाहीच्या राजकारणाला स्पष्ट नकार दिल्याचे मोदी म्हणाले. सहा दशकं सत्ता उपभोगूनही काँग्रेसने बिहारचा गौरवशाली इतिहास विसरला. छठ पूजेसारख्या लोकउत्सवाची थट्टा करणाऱ्यांना बिहारने योग्य उत्तर दिल्याचे त्यांनी नमूद केले.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी