
पटना, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून एआयएमआयएमने आश्चर्यकारक कामगिरी करत लक्ष वेधून घेतले आहे. दुपारी 4 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार काँग्रेस केवळ किशनगंज आणि मनिहारी या दोनच जागांवर आघाडीवर होती.
मतमोजणीत एआयएमआयएमने 6 जगांवर आघाडी घेतली असून 5 जागांवर ओवैसींचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने पुढे आहेत. एआयएमआयएमच्या उमेदवारांनी जोकिहाटमध्ये 27 हजार, बहादूरगंजमध्ये 11 हजार, कोचधमण येथे 23 हजार, अमौर येथे 38 हजार आणि बैसीमध्ये 12 हजार मतांची आघाडी घेतली आहे. निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत भाजपने 3 जागा जिंकल्या तर 89 जागांवर आघाडी घेतलेली होती. मित्रपक्ष जेडीयूने 6 जागा जिंकून 77 जागांवर आघाडी घेतली असून, महागठबंधनचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. रजद केवळ 27 जागांवर आघाडीवर होती.या निकालांमुळे बिहारच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत, तर काँग्रेससमोर स्वतःचा पुनर्विचार करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी