बिहारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पानिपत
मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांत राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसत असतानाच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी मात्र निकाल अत्यंत निराशाजनक ठरत आहेत. आज सकाळी आठ वाजता पोस्टल म
Ajit Pawar


मुंबई, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांत राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसत असतानाच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी मात्र निकाल अत्यंत निराशाजनक ठरत आहेत. आज सकाळी आठ वाजता पोस्टल मतपत्रिकांपासून आणि नंतर ईव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचा एक तास वगळता संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे.

या एकतर्फी लढतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला मुद्दा म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पूर्णपणे गळून पडले असल्याची धक्कादायक स्थिती. बिहारमध्ये पक्षाने 15 उमेदवार उभे केले होते; परंतु सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत एकाही उमेदवाराला आघाडी मिळालेली नाही. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नौटनमधून जयप्रकाश यांना फक्त 186 मते मिळाली आहेत, तर पिंप्रा मतदारसंघातील अमित कुमार कुशवाह 370 मतांवर आहेत. मनिहारीचे सैफ अली खान 2057 , पारसाचे बिपीन सिंह 435 आणि सोनेपूरचे धर्मवीर कुमार तर अवघ्या 25 मतांवर आहेत. महुआ चे अखिलेश ठाकूर 643 राघोपूरचे अनिल सिंह 602 आणि सासाराम आशुतोष सिंह 212 बाखरी, अमरपूर, पाटना साहिब, मोहानिया मधील उमेदवारांची स्थितीही तितकीच बिकट आहे. दिनारा मतदारसंघात मनोज कुमार सिंह 53 मतांवर असून नरकटियागंज आणि राजनगरमधील उमेदवारांचीदेखील स्थिती कमकुवत असल्याचेच संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस विभाजनापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावर चांगली उपस्थिती राखत होती. झारखंड, गोवा, गुजरात, केरळ, नागालँड, मेघालयसारख्या राज्यांत त्यांचे आमदार व खासदार होते. बिहारमध्येही तारिक अन्वर यांच्या माध्यमातून पक्षाला काही प्रस्थ मिळाले होते. मात्र, दोन गटांमध्ये झालेल्या विभाजनानंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमावला गेला. हा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठीच अजित पवारांनी बिहारमध्ये स्वतंत्र लढाईचा मार्ग स्वीकारला होता. परंतु अपेक्षित यश न मिळाल्याने हा प्रयत्न फसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बिहारमधील एकतर्फी राजकीय घडामोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची झालेली अवस्था यामुळे अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रीय राजकारणातील आपली ओळख प्रस्थापित करण्याचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande