बिहार निवडणूक : एनडीएला 203 जागांसह स्पष्ट बहुमत
- एनडीएला यंदा 81 जागा अधिक मिळाल्या - राज्यात भाजप 90 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला - महाआघाडी केवळ 34 जागांवर गुंडाळली गेली पाटणा, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीच्या आज, शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात भाजपप्रणीत एनडीए आघाड
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी


- एनडीएला यंदा 81 जागा अधिक मिळाल्या

- राज्यात भाजप 90 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला

- महाआघाडी केवळ 34 जागांवर गुंडाळली गेली

पाटणा, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीच्या आज, शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात भाजपप्रणीत एनडीए आघाडीला 243 पैकी 203 जागांवर विजय मिळाला आहे. तर 90 जगा जिंकत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राजद, काँग्रेस आणि सहकाऱ्यांची महाआघाडी 34 जागांवर गुंडाळली गेली आहे.

बिहार विधानसभेच्या 243 मतदारसंघांमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान पार पडले. या दोन्ही टप्प्यांत मिळून 2 हजार 616 उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध महाआघाडी यांच्यात होती, जनसुराज हा नवा पक्ष प्रथमच निवडणुकीत उतरला होता. एनडीएमध्ये भाजप, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकदल मोर्चाचा समावेश आहे. दुसरीकडे, महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि भाकप सारखे पक्ष होते. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता असते.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात 2025 मध्ये मतदारांनी नवा विक्रम प्रस्थापित केला. पहिल्यांदाच 66.91 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबर रोजी 65.08 टक्के मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी 68.76 टक्के मतदान झाले होते.

राज्यातील 243 जागांची आज, शुक्रवारी मतमोजणी झाली. यामध्ये एनडीए आघाडीला 243 पैकी 203 जागा मिळाल्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएला यंदा 81 जागा अतिरिक्त मिळाल्याचे दिसून आले. गेल्यावेळच्या निवडणुकीत एनडीएला 122 जागा जिंकता आल्या होत्या. पक्षनिहाय आकडेवारी पाहता भाजप राज्यात 90 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या निवडणुकीत राज्यात भाजपला 74 जागांवर विजय मिळाला होता. म्हणजे यंदाच्या निवडणुकीत गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला 16 जागा अधिक मिळाल्या आहेत. एनडीएचा घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) देखील मोठा विजय संपादित केला आहे. जेडीयू गेल्या निवडणुकीत 43 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदाच्या निवडणुकीत जेडीयूने 85 जागा पटकावल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत जेडीयूने 42 जागा अधिक पटकावल्या आहेत.

राष्टीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि सहकाऱ्यांच्या महाआघाडीला निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. गेल्या निवडणुकीत 114 जागा मिळवणाऱ्या महाआघाडीला यंदाच्या निवडणुकीत 80 जागा गमवाव्या लागल्या आहेत. महाआघाडीला यंदा केवळ 34 जागा मिळताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत 75 जागा जिंकणाऱ्या आरजेडीला 24 जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला बिहारमध्ये 19 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत आरजेडीला 51 आणि काँग्रेसला 13 जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande