बिहार : मुस्लीम बहुल भागात एनडीएची सरशी
पटना, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जोरदार कामगिरी करत 243 पैकी 180 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताविरोधी वातावरण असूनही विरोधकांना पन्नाशीचा आकडाही गाठणे कठीण झाले आहे. तेजस्व
नितीश कुमार आणि मुस्लिम धर्मगुरू संग्रहित फोटो


पटना, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जोरदार कामगिरी करत 243 पैकी 180 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताविरोधी वातावरण असूनही विरोधकांना पन्नाशीचा आकडाही गाठणे कठीण झाले आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, मुस्लीम बहुल भागातही एनडीएला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळत आहे. बिहारच्या एकूण लोकसंख्येत मुस्लीम समाजाचा 17.7 टक्के वाटा आहे. सीमांचलमधील पूर्णिया, सहरसा, किशनगंज, मधेपुरा, कटिहार आणि अररिया या जिल्ह्यांत मुस्लीम मतदारांचा मोठा प्रभाव असून या 24 जागांवर कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष होते. प्रारंभिक कलांनुसार, एनडीएने या 24 पैकी तब्बल 17 जागांवर आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाला मुस्लीम मतदारांनी अनपेक्षित असा मजबूत पाठिंबा दिल्याचे दिसत आहे.

यापूर्वी 2020 च्या निवडणुकीत 19 मुस्लीम आमदार निवडून आले होते. त्यापैकी सर्वाधिक 8 आमदार राजदचे, 5 एआयएमआयएमचे, 4 काँग्रेसचे तर बसप आणि सीपीआयचे प्रत्येकी 1 आमदार विजयी झाले होते. जेडीयूने त्या निवडणुकीत 11 मुस्लीम उमेदवार उभे केले होते; मात्र त्यापैकी एकाही उमेदवाराचा विजय झाला नव्हता. त्यामुळे मावळत्या विधानसभेत मुस्लीम प्रतिनिधित्व फक्त 7.81 टक्के होते.

यंदाच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी मुस्लीम बहुल भागात आक्रमक प्रचार करत सरकारी नोकऱ्यांची आश्वासने दिली होती. परंतु नितीश कुमार यांनी गेल्या काही वर्षांत राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा फायदा एनडीएला मिळाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तोंडी आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष लाभ मिळेल, या अपेक्षेने मुस्लीम मतदारांनी जेडीयूकडे कल झुकवला असल्याचे निवडणूक तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

---------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande