
कोची, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अवैध अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित मानव तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मधु जयकुमार याला ईराणहून परतताच अटक करण्यात आली. आरोपानुसार, तो आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना अवयवदानाच्या नावाखाली ईराणला पाठवत असे आणि तेथे इराणी रुग्णालयांत त्यांच्या उपचारांची व्यवस्था करत असे. या प्रकरणात एनआयएने मधुविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती.
एनआयएने मानव तस्करीसाठी लोकांना ईराणमध्ये पाठवण्याच्या गुन्ह्यात मधु जयकुमार याला पकडले. एर्नाकुलमचा रहिवासी असलेला मधु 8 नोव्हेंबर रोजी ईरानहून परतल्यावर ताब्यात घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएच्या विनंतीनंतर १२ नोव्हेंबरला त्याला कोची येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 19 नोव्हेंबरपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या कोची येथील एनआयए कार्यालयात त्याची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण 18 मे 2024 रोजी उघडकीस आले, जेव्हा कोची विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अवयव तस्करी नेटवर्कमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून एका तरुणाला थांबवले. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांनी केली होती; त्यानंतर तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.सदर आरोपी आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना लक्ष्य करत होते आणि अवयवदानाच्या नावाखाली त्यांना ईराणला नेत असल्याचे चौकशी उघड झाले. त्यांनी अवयव प्राप्तकर्त्यांची ओळख करून देणे, तसेच इराणी रुग्णालयांमध्ये उपचारांची सोय करणे अशी संपूर्ण व्यवस्था केली होती. ईरानमध्ये अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायदेशीर असल्याचा खोटा दावा ते करत होते.
गेल्या वर्षी एनआयएने मधु, सबित, सजीथ श्याम आणि बेल्लमकोंडा राम प्रसाद यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. फेब्रुवारी 2025 मध्ये ईरानमध्ये वास्तव्यास असलेल्या मधुविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली होती. सूत्रांनी सांगितले की मधुची अटक एनआयएसाठी महत्त्वाची आहे, कारण ईरानमध्ये अवयव तस्करीचे संपूर्ण संचालन तोच पाहत होता आणि तेथील रुग्णालयांशी समन्वय साधत होता.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी