
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीतील निकालांचा राष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव पडत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांशी संबंधित मुद्द्यांवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या जनतेनं दिलेले प्रत्येक मत हे “भारताच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या घुसखोर व त्यांच्या समर्थकांविरोधातील मोदी सरकारच्या भूमिकेवरील विश्वासाचं प्रतीक” असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शाह म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी व्होटबँकेसाठी घुसखोरांना वाचवण्याचा” प्रयत्न केला, मात्र बिहारच्या जनतेनं त्यांना “परखड उत्तर” दिले आहे.देशातील मतदार याद्यांची फेरतपासणी करणे आवश्यक आहे.याच्या विरोधातील राजकारणाला आता कोणतीही जागा उरलेली नाही असे शाह म्हणाले. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस बिहारमध्ये शेवटच्या पायरीवर पोहोचल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. बिहार हे देशातील महत्त्वाचं राजकीय राज्य मानलं जात असल्याने तिथले संकेत राष्ट्रीय पातळीवरील वातावरण ठरवतात, असे तज्ञांचे मत आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळे पुढील काही दिवसांत केंद्रवर्ती राजकारणात अधिक चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी