


नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। नोव्हेंबरच्या प्रारंभी सुरू झालेल्या त्रिशूळ त्रि-सेवा सरावाचा (टीएसई-2025) यशस्वी समारोप झाला. भारतीय नौदलाने या सरावाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली. या सरावात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलही सहभागी झाले होते. तिन्ही दलांनी संयुक्तपणे या सरावाचे आयोजन केले होते.
भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडने या त्रि-सेवा सरावाचे नेतृत्व केले. यासोबतच भारतीय लष्कराचे दक्षिण कमांड आणि भारतीय हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम हवाई कमांडनेदेखील या सरावत प्रमुख सहभागी दल म्हणून भाग घेतला होता.
या सरावाअंतर्गत राजस्थान तसेच गुजरातच्या खाडी आणि वाळवंटी प्रदेशासह, सागरी प्रदेशातील मोहीमा, आणि यासोबतच अरबी समुद्राच्या उत्तर भागात पाण्यासह भुपृष्ठावरील मोहिमांचा सराव केला गेला. भारतीय तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दल आणि इतर केंद्रीय यंत्रणांनीही या सरावात भाग घेतला. या सरावांच्या माध्यमातून या सर्व यंत्रणांमधील परस्पर समन्वय आणि एकात्मिक मोहिमांच्या नियोजनाला अधिक बळकटी मिळाली.
संयुक्त मोहिमांची परिणामाकारकता सुनिश्चित करता यावी या उद्देशाने, या सरावाअंतर्गत, सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वय वाढवणे, तिन्ही सुरक्षा दलांमधील बहुक्षेत्रीय एकात्मिक कार्यपद्धतींच्या परिणामकारतेची चाचणी घेणे, यावर भर दिला गेला होता. यासोबतच उपलब्ध व्यावसपीठे आणि पायाभूत सुविधांची परस्पर समन्वयित कार्यक्षमता वाढवणे, तीन दलांमधील संपर्क जाळ्याच्या एकात्मिकीकरणाला बळकटी देणे, आणि संयुक्त मोहिमांना चालना देणे, हे ही या सरावाच्या आयोजनामागची प्रमुख उद्दिष्टे होती.
या सरावाच्या माध्यमातून संयुक्त गुप्तहेर क्षमता, पाळत आणि टेहळणी कार्यपद्धती, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि सायबर युद्धांशी संबंधित संयुक्त नियोजनाची परिणामकारकताही तपासली गेली. या अनुषंगाने आयोजित केलेल्या सराव मोहिमेअंतर्गत, हवाई मोहिमांसाठीच्या सर्वोत्तम कार्यप्रणालीचे आदानप्रदान आणि संयुक्त मानक कार्य प्रणालीची परिणाकारकतेची क्षमता पडताळता यावी यासाठी, भारतीय हवाई दलाच्या अखत्यारितील किनापरपट्टीलगतच्या क्षेत्रात भारतीय नौदलाच्या विमानवाहू नौकांच्या संयुक्त सराव मोहीमांचाही यात समावेश होता.
त्रिशूळ या सरावाच्या माध्यमातून स्वदेशी प्रणालींचा प्रभावी वापर आणि आत्मनिर्भर भारताचे तत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले. यासोबतच संभाव्य उदयोन्मुख धोके, तसेच विद्यमान आणि भविष्यातील युद्धाच्या बदलत्या स्वरुपाच्या अनुषंगाने आपल्या कार्यपद्धती आणि तंत्रांत सुधारणा घडवून आणण्यावरही, या सरावात भर दिला गेला होता.
त्रि-सेवा सरावाच्या यशस्वी आयोजनातून भारतीय सशस्त्र दलांचा पूर्णतः एकात्मिक पद्धतीने कार्यवाही करण्याचा सामूहिक संकल्प अधोरेखित केला असून यातून सर्व दलांमधील संयुक्त परिचालन सज्जता आणि राष्ट्रीय सुरक्षा सज्जता अधिक वृद्धिंगत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule