
परभणी, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
सध्याच्या काळात शेतीला पूरक व्यवसाय असणे गरजेचे आहे. हा जोड व्यवसाय असेल तर शेतकरी अडचणीत येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे विशेषतः मुरघास युनिट टाकावे किंवा घरच्या घरी मुरघास तयार करावा असे आवाहन कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी केले. पाथरी तालुक्यातील बांदरवाडा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषी विभागातर्फे सेंद्रिय तथा शाश्वत शेती व शेती पूरक व्यवसाय या विषयावर कृषी मेळावा व परिसंवाद कार्यक्रम पार पडला, यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. भाग्येश बशेट उपस्थित होते. यावेळी गोविंद कोल्हे, डॉ.भाग्येश बशेट, बालासाहेब गायकवाड, नंदा गायकवाड यांनी सेंद्रिय शेती, शेती पूरक व्यवसाय, पशुधन विभाग योजना याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गावचे सरपंच, सदस्य, पोलिस पाटील व बहुसंख्येने शेतकरी, महिला उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis