
चंद्रपूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि एका नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून विविध कामांसाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनी निवडणुकीची कामे जबाबदारीने पार पाडावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नोडल अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचा-यांनी योग्य रितीने आपले कर्तव्य बजावावे. यासाठी सुक्ष्म नियोजन करा. निवडणुकीच्या कामांमध्ये कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. त्यासाठी पुर्वतयारी करून ठेवा, अशा सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी मतदान कर्मचारी -मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, साहित्य मागणी व वितरण, मतपत्रिका, मतदार यादी, वाहन व्यवस्थापन, संगणक सुरक्षा आयटी ॲप्लीकेशन, मतदार जनजागृती, कायदा-सुव्यवस्था व सुरक्षा नियोजन, ईव्हीएम मशीन व्यवस्थापन, आचारसंहिता -ऑनलाईन तक्रार निवारण, खर्च नियंत्रण, टपाली मतपत्रिका छपाई, माध्यम व सनियंत्रण, समन्वय जिल्हा निवडणूक संपर्क कक्ष, तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष व नियंत्रण कक्ष, निवडणूक निरीक्षक, दिव्यांग मतदार मदत व सनियंत्रण कक्ष आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रभारी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभम दांडेकर, उपजिल्हाधिकारी संजय पवार, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव