
जळगाव, 15 नोव्हेंबर (हिं.स.)एकीकडे महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं ‘जय महाराष्ट्र’ करत राजीनामा दिला. जळगाव शहर सहसंपर्क प्रमुख नीलेश पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे.विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्ष पदावरून शिवसेना शिंदे गटात पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले होते. गेल्या वर्षी नीलेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यातून निर्माण झालेल्या नाराजी नाट्यनंतर दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. शिवसेनेने नीलेश पाटील यांना जळगाव शहर सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी संपवली होती; परंतु त्यानंतरही पाटील हे वर्षभरापासून पक्षापासून अंतर ठेवून होते. जिल्हाप्रमुख भंगाळे हे पक्षाचे कार्यक्रम, बैठकांची निरोप देत नाहीत, बोलवत नाही असाही आरोप पाटील यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या संपर्कात असून लवकरच पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर