
हिंगोली, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी वसमत तालुक्यातील जुनुना येथे भेट देऊन प्रकरणाचा सखोल आढावा घेत प्रशासनाला लवकरात लवकर संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. याबाबत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व समाज कल्याण विभाग यांच्यात समन्वयाने वेगाने कार्यवाही करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
यावेळी अनुसूचित जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, तहसीलदार शारदा दळवी, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणातील सर्व बाबींची तपशीलवार चौकशी करून निश्चित कालावधीत अहवाल आयोगाला सादर करण्याची जबाबदारी समितीला देण्यात आली आहे.
उच्चस्तरीय अधिकारी (आयपीएस) अपर पोलीस अधीक्षक योगेशकुमार मीना यांना काही वर्षापूर्वी झालेल्या खून प्रकरणाच्या सुरुवातीपासून तपासाची पावले, पुरावे, नोंदी, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण तपासाचा प्रवास यांचा सविस्तर अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
सद्यस्थितीत जुनुना गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि गावातील प्रत्येक समाजाचा एक प्रतिनिधी सहभागी करून ग्रामपातळीवरील शांतता समिती तातडीने स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या समितीने दर पंधरा दिवसाला आढावा बैठक घेऊन गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी सूचना आयोगाने केली.
यासोबतच एकसदस्यीय चौकशी समिती, पोलीस विभागाचा सविस्तर तपास अहवाल आणि ग्रामस्तरीय शांतता समित्यांच्या अहवालासह सर्व तीन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आयोग अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जुनुना प्रकरणातील सत्यस्थिती प्रकाशात येण्यासाठी प्रशासन आता अधिक सज्ज असून, आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाहीला गती मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis