
रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये उद्याच्या रविवारसह १७ नोव्हेंबरपर्यंत पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना संकेतस्थळावर (online) तसेच पारंपरिक (offline) पद्धतीने आपले उमेदवारी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील, असे आदेशित केले असल्याचे जिल्हा सहआयुक्त वैभव गारवे यांनी कळविले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार नगरपालिका आणि लांजा, देवरूख आणि गुहागर या तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येतील. नियोजित वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी