
नोएडा, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची मनोभूमिका अधिक उंचावली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील राम सुतार यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच स्थानिक खासदार डॉ. महेश शर्मा यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “देश-विदेशात भव्य शिल्पनिर्मिती करून भारताची ओळख जगभर पोहोचवणारे राम सुतार हे खऱ्या अर्थाने ऋषितुल्य आणि प्रतिभासंपन्न शिल्पकार आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या जगप्रसिद्ध भव्य शिल्पाची निर्मिती ही त्यांची अद्वितीय कामगिरी आहे. चैत्यभूमीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ या पुतळ्याची निर्मिती ही देखील तेच करत आहेत. जगभरातील इतर स्मारके विविध पुतळे त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक कलाकृती ही अभिमानाची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “राम सुतार यांनी शंभर वर्षांचा जीवनप्रवास पूर्ण केला असूनही त्यांची सर्जनशील ऊर्जा अद्याप अटळ आहे. त्यांच्या कार्याचा वारसा ज्येष्ठ शिल्पकार अनिल सुतार समर्थपणे पुढे नेत आहेत. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा याच उत्कृष्ट शिल्पपरंपरेचे उदाहरण आहे.”
दरम्यान, बिहार निवडणुकीतील यशाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “जनतेने जंगलराज नाकारून विकासराज स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी प्रचंड विश्वास दाखवला. महिलांचा मतदानाचा टक्का तब्बल 60 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढला. युवा वर्ग, महिला आणि सर्वच घटकांनी भरभरून मतदान केल्याने बिहारमध्ये विकासाला चालना देणारा निकाल मिळाला आहे.”
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप नेतृत्व तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर