
नंदुरबार, 15 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यांत कुष्ठरोग प्रसार शून्यावर आणण्यासाठी १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान 'कुष्ठरोग शोध अभियान' राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे,डॉ विनय सोनवणे ल,जिल्हा शल्यचिकित्सक आणि डॉ महेंद्र चव्हाण,सहायक संचालक, कुष्टरोग यांनी दिली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांच्या आदेशाने व मार्गदर्शन खाली हे अभियान १४ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राज्याने सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय निश्चित केले आहे. या ध्येयाच्या अनुषंगाने, कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नवीन कुष्ठरोग शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानात समाजातील निदान न झालेले कुष्ठरोग लवकरात लवकर शोधून काढणे, असे उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे अभियान घरोघर सर्वेक्षणाद्वारे राबविण्यात येणार असून अभियानात जिल्ह्यांमधील ग्रामीण भाग आणि शहरी भागातील ३ लाख ५४ हजार ६१० घरे व १७ लाख ७२ हजार ५२७ इतक्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १३६२ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
या सर्वेक्षणादरम्यान, पथकातील सदस्य घरातील सर्व सभासदांची कुष्ठरोगाबाबत शारीरिक तपासणी करतील. महिला सभासदांची तपासणी 'आशा' मार्फत आणि पुरुष सभासदांची तपासणी पुरुष स्वयंसेवकांमार्फत केली जाईल. दरम्यान, त्वचेवर फिकट लालसर बधिर चट्टे, ज्याठिकाणी घाम येत नाही, त्वचा जाड, बधिर चकचकीत असणे आदी कुष्ठरोगाची लक्षणे असून अशा नागरिकांनी तपासणी करणे गरजेचे आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या संशयित कुष्ठरुग्णांची तपासणी प्राधान्याने प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जाईल आणि निदान निश्चित झाल्यावर त्वरित औषधोपचार सुरू करण्यात येणार असल्याचेही डॉ. रविंद्र सोनवणे व डॉ.महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर