
नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षातर्फे आज पक्षाच्या शहर कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांनी आदिवासींचे प्रेरणास्थान असलेल्या ‘धरती आबा’ बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करत पुष्प अर्पण केले. भाषणांमध्ये त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा आणि संस्कृती-संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला.
भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले की बिरसा मुंडा यांचे साहस, सामाजिक सुधारणा आणि स्वाभिमानाचे विचार आजही देशाला प्रेरित करत आहेत. बिरसा मुंडा यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे उलगुलान (महातुमुल) या व्यापक आंदोलनाचे नेतृत्व. हे आंदोलन ब्रिटिशांच्या अत्याचाराविरोधात आणि आदिवासींच्या जमिनींचे हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी होते. शेवटी त्यांना अटक करण्यात आली आणि केवळ २५ व्या वर्षी तुरुंगात त्यांचा मृत्यु झाला, पण त्यांच्या संघर्षाने आदिवासी भागात स्वाभिमान आणि प्रतिकाराची ज्योत प्रज्वलित केली. आज बिरसा मुंडा यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वीर, आदिवासी हक्कांचे प्रवर्तक, आणि समाजसशक्तीकरणाचे प्रतीक म्हणून गौरवले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात त्यांच्या जयंतीला ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
याप्रसंगी भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, .बाळासाहेब सानप, महानगर सरचिटणीस ॲड.श्याम बडोदे, काशिनाथ शिलेदार, उदय जोशी, वसंत उशीर, नारायण जाधव, रुपाली निकुळे, ज्योती कवर, अनिता भामरे, अविनाश बल्लाळ, देवेंद्र चुंभळे, विजय कुलकर्णी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV