
अमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)
चिखलदरा तालुक्यातील आदिवासी बहुल हतरू आणि एकताई या दोन केंद्रांमध्ये शिक्षकांची अभूतपूर्व आणि गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना शिक्षकांची कमतरता वाढतच असून, अनेक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरवशावर चालवल्या जात आहेत. या परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे केवळ अशक्य झाले असून, संतप्त स्थानिक पालकांनी जोपर्यंत दुसरा शिक्षक शाळेत येत नाही, तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा तीव्र इशारा दिला आहे. या शैक्षणिक कोंडमार्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
बदलीनंतरही शिक्षक अडकले: 'न कार्यमुक्त, न नियुक्ती!'
या केंद्रांमधील शैक्षणिक कोंडमारा अधिक गंभीर होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे प्रशासनाचा गोंधळ आहे. हतरू तसेच एकताई केंद्रामध्ये मागील एक वर्षापासून जवळपास सर्व शिक्षकांच्या बदल्या होऊन देखील, त्या ठिकाणी पर्यायी शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कार्यमुक्त केलेले नाही.जे शिक्षक नवीन ठिकाणी बदली होऊन जाण्यासाठी उत्सुक आहेत, ते जुन्याच शाळेत अडकून पडले आहेत आणि त्यांच्या बदल्यांचे आदेश असूनही ते रुजू होऊ शकत नाहीत. यामुळे त्यांची मानसिक कुचंबणा होत आहे, तसेच बदली प्रक्रियेचे उद्दिष्टही पूर्ण झालेले नाही. या परिस्थितीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी असे दोघेही त्रासात आहेत.
एकताई केंद्राची हृदयद्रावक स्थिती: संपूर्ण शाळा एका शिक्षकावर
एकताई केंद्रातील परिस्थिती तर अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. येथे एकूण ९ शाळा असून, केवळ ९ नियमित शिक्षक उपलब्ध आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे — प्रत्येक शाळेत केवळ १ शिक्षक संपूर्ण कामाचा भार सांभाळत आहे!
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी