
जिल्हा परिषदेत गोंधळाची स्थिती नवी तारीख 24 नोव्हेंबरअमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.)जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही यादी आगामी २४ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल. यामुळे अमरावती जिल्ह्यातील ५९ जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समिती मतदारसंघांतील मतदारांची नेमकी संख्या त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या स्वाक्षरीने दोन दिवसांपूर्वी एक पत्र जारी करण्यात आले. या पत्रामुळे ११ नोव्हेंबर रोजी यादी घोषित करण्याच्या तयारीत असलेले जिल्हा प्रशासन अचानक थांबले असून, आता अधिकारी व कर्मचारी २४ नोव्हेंबरच्या तयारीला लागले असल्याची माहिती देण्यात आली
राज्य निवडणूक आयोगाच्या जुन्या वेळापत्रकानुसार, जिल्हा परिषदेची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर १४ ऑक्टोबरपर्यंत या यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (SDO) स्तरावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती सुधारणा केलेल्या अंतिम मतदार यादीची घोषणा २७ ऑक्टोबर रोजी अपेक्षित होती. मात्र, आयोगाने ऐनवेळी ३ नोव्हेंबर ही नवी तारीख दिली.अमरावती वगळता राज्यातील इतर काही जिल्ह्यांचे कामकाज पूर्ण न झाल्याने ३ नोव्हेंबरलाही यादीची घोषणा झाली नाही. त्यानंतर ११ नोव्हेंबर ही नवी तारीख देण्यात आली होती. आता पुन्हा ती तारीख २४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे आयोगाने कळवले आहे. या वाढीव मुदतीचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. नागरिकांकडून आता चौथ्यांदा मुदतवाढ देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार यादी जाहीर होण्याकडे जिल्हाभरातील नागरिकांचे आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या मतदारसंघातील मतदारांचा नेमका आकडा जाणून घ्यायचा आहे. प्रारूप मतदार यादीत सुमारे १५ लाख ३३ हजार मतदार आहेत. एकूण मतदारांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही, परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या जाणून घेण्यासाठी आता आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी