
नवी मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। नवी मुंबईत मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल झाला आहे. नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगी न घेता अनावरण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे आणि सुमारे ७० मनसैनिकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
चार महिन्यांपासून पुतळा झाकून ठेवण्यात आला होता आणि अनावरणाची प्रक्रिया रखडल्याने स्थानिकांमध्ये नाराजी होती. या घडामोडीची माहिती मिळताच कौपरखैरणे येथे मनसे शाखा उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांनी थेट घटनास्थळी जाऊन मनसैनिकांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण केले. पोलिसांच्या डोळ्यादेखत झालेले अनावरण आणि त्यावेळी मनसैनिक व पोलिसांमध्ये झालेली किरकोळ झटापट यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून तयार असलेला महाराजांचा पुतळा धूळ खात पडलेला पाहून त्यांना व्यथित वाटले. अनेक मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पंतप्रधान नवी मुंबईत विविध कार्यक्रमांसाठी आले, मात्र महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी कुणालाच वेळ मिळाला नाही, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या मागणीनुसार उभारलेला हा पुतळा कपड्यात झाकून ठेवलेला पाहून मनसे कार्यकर्ते आणि नवी मुंबईकर यांनाही राग आला असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, 'स्वराज्याचे संस्थापक, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करायला त्यांना एक तासही मिळाला नाही का? निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून महाराजांच्या नावावर टाळ्या घेणाऱ्यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही?हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे' ,अशी ही टीका त्यांनी केली होती.
आपल्या या कृतीसाठी केस दाखल झाली तरी आनंदच असल्याचे म्हणत, “ही माझ्या आयुष्यातील पहिली केस असेल, पण महाराजांसाठी अशा शेकडो केसेस अंगावर घ्यायला तयार आहे,” असा ठाम पवित्रा अमित ठाकरेंनी घेतला. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अनधिकृत अनावरण आणि झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे व मनसैनिकांवर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule