भारत कोणत्याही युद्धासाठी पूर्णपणे तयार - जनरल द्विवेदी
नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर (हिं.स.)। ”भारत आता कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन करणार नाही आणि देश सर्व प्रकारच्या दीर्घ संघर्षासाठी पूर्णपणे तयार आहे”, असे सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी चाणक्य डिफेन्स डायलॉगमध्ये सांगितले. जनरल द्विवेदी
भारत कोणत्याही युद्धासाठी पूर्णपणे तयार- जनरल द्विवेदी


नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर (हिं.स.)। ”भारत आता कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन करणार नाही आणि देश सर्व प्रकारच्या दीर्घ संघर्षासाठी पूर्णपणे तयार आहे”, असे सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी चाणक्य डिफेन्स डायलॉगमध्ये सांगितले.

जनरल द्विवेदी म्हणाले की पाकिस्तान कितीही आडून दहशतवादाला पाठिंबा देत राहो, भारतीय सेना त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवते. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांत काश्मीरमधील दहशतवादात मोठी घट झाली आहे आणि मारल्या गेलेल्या 61% दहशतवादी पाकिस्तानी होते—यावरून सीमापार दहशतवादाची साखळी अद्याप सुरु असल्याचे सिद्ध होते. त्यांनी सांगितले की जम्मू–काश्मीरमधील परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि आजचे तरुण भारतासोबत आपले भविष्य पाहत आहेत.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना ते म्हणाले, “हे तर फक्त ट्रेलर होता ,जो 88 तासांत संपला. गरज पडली तर पाकिस्तानला दाखवून दिले जाईल की जबाबदार देश आपल्या शेजाऱ्याशी कसा वर्तन करतो.” त्यांनी हेही स्पष्ट केले की भारत कोणत्याही प्रकारच्या अणु-धमकीला (न्यूक्लियर ब्लॅकमेल) घाबरणारा नाही आणि युद्ध चार महिने चालो किंवा चार वर्षे—भारतीय सेना सदैव तयार आहे.

जनरल द्विवेदी म्हणाले की भारताचे न्यू नॉर्मल म्हणजेच नियम स्पष्ट आहेत — रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत. संवाद आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही.ते पुढे म्हणाले की राज्य प्रायोजित दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना भारत योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी सदैव तयार आहे. “जर आमच्याकडे कोणतीही धमकीवजा चिठ्ठी आली, तर आम्हाला नेमके माहित आहे की उत्तर कुणाला द्यायचे.”

सेना प्रमुखांनी सांगितले की ऑक्टोबर 2024 नंतर चीनसोबतचे संबंध सुधारले आहेत. तरीही, सीमाप्रश्नी भारताची भूमिका ठाम आहे आणि संवादही योग्य दिशेने पुढे जात आहे. त्यांनी नमूद केले की आजच्या काळात सुरक्षा आव्हाने बदलत आहेत आणि भारताला सर्व प्रकारच्या दीर्घकालीन संघर्षासाठी सज्ज राहावे लागेल. भारताची रणनीती स्पष्ट आहे — शांततेचे प्रयत्नही सुरू राहतील आणि गरजेची कारवाईही केली जाईल.

मणिपूरबाबत जनरल द्विवेदी म्हणाले की राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर परिस्थितीत मोठा सुधार झाला आहे. लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला असून समुदायांमध्ये परस्पर विश्वास पुन्हा दृढ होत आहे. डूरंड कपच्या वेळी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या भेटीने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यास महत्त्वाची मदत केली. त्यांनी आशा व्यक्त केली की परिस्थिती अशीच सुधारत राहिली तर राष्ट्रपती लवकरच राज्याचा दौरा करू शकतील.

शेवटी, सेना प्रमुख म्हणाले की भारत शांती इच्छितो, परंतु पाकिस्तानने समजून घ्यायला हवे की दहशतवादाचा वापर भारतावर दबाव टाकण्याचे साधन होऊ शकत नाही. शांतता प्रक्रियेला पाठिंबा द्यायला हवा आणि जे त्यात अडथळे निर्माण करतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई आवश्यक असेल. सेना प्रमुखांचे हे वक्तव्य भारताची सुरक्षा धोरणे, शेजारी देशांशी संबंध आणि दहशतवादाविरुद्धची कठोर भूमिका स्पष्टपणे दर्शवतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande