
मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सीएनजीचा पुरवठा गंभीरपणे बाधित झाला असून अनेक ठिकाणी पंप बंद होण्याची वेळ आली आहे. पहाटेपासूनच सीएनजी पंपांवर लांबलचक रांगा लागल्या असून अचानक वाढलेल्या मागणीसोबत पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे तुटवडा अधिकच तीव्र झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या माहितीनुसार, आरसीएफ परिसरात गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून यामुळे वडाळा येथील सिटी गेट स्टेशनला जाणारा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. पाइपलाइन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सीएनजी पुरवठा खंडित झाल्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर तसेच काही बेस्ट बससेवेवर दिसून येत आहे. महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वाहने कंप्रेस्ड नॅचरल गॅसवर चालत असल्याने पंपांवरील तुटवडा सार्वजनिक वाहतुकीवर थेट दबाव निर्माण करतो आहे. अनेक सीएनजी पंपांत गॅस उपलब्ध नसल्याने ठाणे आणि नवी मुंबईतील पंपही बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थिती पाहता ओला-उबरचे भाडे तात्पुरते वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला महानगर गॅस लिमिटेडने दिला आहे. तथापि, नागरिकांना दिलासा देत कंपनीने स्पष्ट केले आहे की घरगुती पीएनजी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. घरातील पाइप गॅस पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहील, असे कंपनीचे म्हणणे आहे.गॅस पाइपलाइनमधील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना काहीसा त्रास सहन करावा लागू शकतो. प्रशासन आणि महानगर गॅस लिमिटेडकडून पुरवठा स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र पुढील काही दिवस सीएनजी मिळणं कठीण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule