
नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर (हिं.स.)।सौदी अरेबियामध्ये एका भीषण रस्ते अपघातात अनेक भारतीयांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. सोमवारी (17 नोव्हेंबर 2025) मक्का ते मदीना जात असलेली एक प्रवासी बस एका डिझेल टँकरला धडकली. या भीषण अपघातात 42 भारतीय उमरा तीर्थयात्रिंच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात असून बसमधील सर्व जण हैदराबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात भारतीय वेळेनुसार पहाटे सुमारे 1:30 वाजता ‘मुफ़रीहाट’ नावाच्या ठिकाणी झाला. उमराहसाठी गेलेल्या भाविकांना घेऊन जाणारी बस तेलाच्या टँकरवर जाऊन धडकली आणि हा अपघात घडला. हा अपघात मदीनाजवळ झाला असून मृतांमध्ये अनेक भारतीय उमराह भाविकांचा समावेश असल्याची भीती आहे.ज्यांपैकी बरेचजण हैदराबादचे रहिवासी असल्याचे मानले जात असून त्यामध्ये महिला, मुले आणि पुरुष यांचा समावेश होता. अनेक प्रवासी झोपेत होते आणि त्यांना अपघाताचा कोणताही अंदाजही आला नाही. उमरा पूर्ण करून सर्व जण ज़ियारतसाठी मदीनाकडे जात होते.घटनेनंतर सौदी अधिकारी आणि आपत्ती निवारण पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. बचाव कार्य अनेक तास सुरू राहिले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, लवकरच औपचारिक पुष्टी होण्याची अपेक्षा आहे.
तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनात सौदी अरेबियातील या रस्ते अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांनी तत्काळ मुख्य सचिव आणि डीजीपी यांना अपघाताबाबतची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अपघातात मृत्यू झालेले किती जण हैदराबादचे रहिवासी होते याची माहिती मागवली आहे. मुख्यमंत्री यांनी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा आणि सौदी अरेबियातील दूतावासाकडून माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे.मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार अधिकारी सौदी अरेबियातील या अपघातात किती जण तेलंगणाचे होते याचा तपास करत आहेत. तसेच पीडितांच्या नातेवाइकांना माहिती देता यावी म्हणून सचिवालयात एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सौदी अरेबियातील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. टोल-फ्री क्रमांक ८००२४४०००३ आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode