
चंद्रकांत वानखडे अध्यक्ष, सुदर्शन जैन उद्घाटक, डॉ. निकम स्वागताध्यक्षअमरावती, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती येथे २० व २१ डिसेंबर रोजी तिसरे परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे हे संमेलन पार पडणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, शेतकरी आंदोलक चंद्रकांत वानखडे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जैन संघटनेचे सुदर्शन गांग (जैन) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल, तर निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम स्वागताध्यक्ष असतील.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून हे संमेलन आयोजित केले जात आहे. संमेलनाच्या मुख्य आयोजिका डॉ. शोभाताई रोकडे यांनी ही माहिती दिली. नुकतीच संमेलनाच्या आयोजन समितीची एक महत्त्वाची बैठक अभियंता भवन येथे पार पडली, ज्यात सर्वानुमते या निवडींवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखडे हे ज्येष्ठ साहित्यिक, शेतकरी आंदोलक आणि समाजसेवक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या चळवळीतील ते प्रमुख कार्यकर्ते आहेत. बिहारमधील भीषण दुष्काळासाठी स्थापन झालेल्या 'तरुण शांती सेना' या चळवळीत त्यांचा सहभाग होता. १९७५ च्या आणीबाणीत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ता म्हणून त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा या खेडेगावात २० वर्षे वास्तव्य केले. 'शेतकरी आत्महत्या', 'एका साध्या सत्यासाठी', 'असे छळले राजबंद्यांना', 'आपुलाची वाद आपणांसी' आणि 'गांधी का मरत नाही' ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
या संमेलनात विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. यामध्ये ग्रंथदिंडी, प्रकट मुलाखत, परिसंवाद, वऱ्हाडी कविसंमेलन, निमंत्रितांचे दोन कविसंमेलने, कथाकथन, बालकविसंमेलन आणि ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा यांचा समावेश आहे.
संमेलनाच्या निमित्ताने कथा व काव्यस्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधील सर्वोत्कृष्ट तीन क्रमांकांना रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्रकासह सन्मानित केले जाईल. याव्यतिरिक्त, समाजसेवा, साहित्य, कला, आरोग्य आणि पत्रकारिता या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंतांना 'परिवर्तन पुरस्कारा'ने गौरवण्यात येणार आहे. तसेच, विविध नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांचे विमोचनही या संमेलनात केले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी