
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने ४९ वा स्मृती समारोह २५ ते २७नोव्हेंबरदरम्यान अंबाजोगाईत होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उद्घाटन, कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, शेतकरी परिषद, संगीत मैफल, पुरस्कार वितरण आणि समारोप समारंभ होणार आहे.
२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता उद्घाटन नांदेडचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते होईल. रात्री ८.३० वाजता कवी संमेलन होईल. सूत्रसंचालन अविनाश भारती करतील. शरद धनगर, - पुनीत मातकर, अनंत राऊत, डी. के. शेख, लता कदम, अविनाश काठवटे, गुंजन पाटील, गजानन मते, सुनील उन्हाळे, सय्यद चांद तरोडकर आणि आत्माराम जाधव सहभागी होतील. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा - होईल. सकाळी १०.३० वाजता बाल आनंद मेळावा होईल.
त्यात विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. अध्यक्ष विठ्ठल जाघव असतील. चित्रकार त्र्यंबक पोखरकर पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतील.
सायंकाळी ८ वाजता 'सोबतीचा करार' ही संगीत मैफल होईल. वैभव जोशी यांच्या कविता व गझलांवर आधारित या कार्यक्रमात दत्तप्रसाद रानडे आमोद गायन करतील. त्यांना निनाद सोलापूरकर, समीर शिवगार, कुलकर्णी आणि संगीतकार आशिष मुजुमदार साथ देतील. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शेतकरी परिषद होईल. अध्यक्ष विजया गंगाधर घुले असतील. त्या शेतीतील प्रयोग व फळबागांविषयी अनुभव सांगतील. अध्यक्ष डॉ. कमलताई गवई असतील.
यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यंदा सन्मान होणार आहे. कृषी क्षेत्रात विजया घुले, साहित्य क्षेत्रात केशव वसेकर, संगीत क्षेत्रात पं. मुकेश जाधव यांना गौरवण्यात येणार असून, क्रीडा युवा गौरव पुरस्कारासाठी खो-खो विश्वविजेती प्रियंका इंगळेची निवड झाली आहे. रोख पारितोषिक, शाल, स्मृतिचिन्ह असा पुरस्कार समारंभ डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
त्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार दिले जातील. विजया घुले यांना कृषी, केशव वसेकर यांना साहित्य, पं. मुकेश जाधव यांना संगीत, प्रियंका इंगळे हिला क्रीडा युवा गौरव पुरस्कार दिला जाईल. पुरस्कारात शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पहार व पाच हजार रुपये रोख रक्कम दिली जाईल. यावेळी भगवानराव शिंदे यांचा विशेष सन्मान होईल. रात्री ८.३० वाजता शास्त्रीय संगीत सभा होईल. पं. मुकेश जाधव यांचे तबला सोलो वादन होईल. त्यानंतर कृष्णा बोंगाणे यांचे गायन होईल. त्यांना आशय कुलकर्णी तबल्यावर, अभिषेक शिनकर संवादिनीवर साथ देतील.
या तिन्ही दिवशी ग्रंथ विक्री, चित्रकला व हस्तकला प्रदर्शन होईल. सर्व कार्यक्रम वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयात होतील. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, डॉ. कमलाकर कांबळे, सतीश लोमटे, प्रा. सुधीर वैद्य, डॉ. प्रकाश प्रयाग, प्रा. भगवान शिंदे, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, त्र्यंबक पोखरकर, भगवान शिंदे व राजपाल लोमटे यांनी केले आहे.
----
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis