
रत्नागिरी, 18 नोव्हेंबर, (हिं. स.) | रत्नागिरी जिल्ह्यात सात नगराध्यक्षपदांसाठी ५६, तर १५१ नगरसेवकपदांसाठी ६३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायती अशा सात संस्थांच्या अध्यक्षपदांसाठी एकूण ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकूण १५१ नगरसेवक पदांसाठी ६३५ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल (दि. १७ नोव्हेंबर) अंतिम मुदत होती. ती संपल्यानंतरची आकडेवारी नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त वैभव गारवे यांनी जाहीर केली आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या अगदीच किरकोळ होती. महत्त्वाच्या पक्षांनी तोपर्यंत आपले उमेदवार जाहीर केले नव्हते; मात्र १४ ते १७ नोव्हेंबर या अखेरच्या चार दिवसांत राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला वेग आला आणि मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज सादर केले.
रत्नागिरीच्या अध्यक्षपदासाठी सात, चिपळूणच्या अध्यक्षपदासाठी १३, खेडसाठी आठ, तर राजापूर नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुहागर आणि लांजा या नगर पंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी प्रत्येकी सात, तर देवरूख नगर पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. नगरसेवक पदासाठी रत्नागिरीत ३२ जागांसाठी १३२, चिपळुणात २८ जागांसाठी १४१, खेडमध्ये २० जागांसाठी ८२, तर राजापूरमध्ये २० जागांसाठी ६५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. गुहागर, देवरूख आणि लांजा या नगर पंचायतींमधील प्रत्येकी १७ जागांसाठी ५६, ७९ आणि ८० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी