
अकोला, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्ये सुधारण्यासाठी निपुण कार्यक्रम राबवला जातो. जिल्ह्याची स्थिती फारशी समाधानकारक नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण यंत्रणा व शिक्षकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज, मंगळवारी दिले. महसूल सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय निपुण सुकाणू समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके, एकात्मिक बालविकास उपमुख्य कार्यकारी अमित रायबोले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणित यासारख्या मूलभूत गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी निपुण कार्यक्रम राबवला जातो. राज्याच्या क्रमवारीतील जिल्ह्याचे स्थान पाहता या शैक्षणिक स्थितीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तावाढीसाठी सर्व घटकांनी जबाबदारीने काम करावे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता अंकोश ससाने यांनी सादरीकरण केले.उपशिक्षणाधिकारी जितेंद्रकुमार प्रधान, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, महापालिका शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, वरिष्ठ अधिव्याख्याता प्रविण चव्हाण, अधिव्याख्याता रविंद्र सोनुने, विजयसिंग राठोड, राजेंद्र अजगर, शिक्षण विस्तार अधिकारी श्याम राऊत, भाषातज्ज्ञ जितेंद्र काठोळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर लहाने, प्रथम संस्थेचे विभागीय समन्वयक वैभव निर्मल उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे