

नागपूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। महानगरामध्ये करदात्यांचे प्रमाण जास्त आहे परंतु टायर 2 आणि टायर 3 शहरांमध्ये कर क्षेत्र आणि करदाते वाढवण्यासाठी जास्त प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी 'टॅक्सपेअर्स हब नागपूर ' या उपक्रमाच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना आयकर कायदा तरतुदी, करदायित्व त्याचप्रमाणे वजावट यांची माहिती मिळावी याकरिता जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन नागपूरच्या मुख्य प्रधान आयुक्त मालती श्रीधरन यांनी केले.
नागपूरच्या आयकर विभागातर्फे 'टॅक्स पेयर्स हब- नागपूर' या शिबिराचं आयोजन 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे ,या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अतिरिक्त महासंचालिका रितू शर्मा प्रामुख्याने उपस्थित होत्या.
चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स इथे आयोजित या तीन दिवसीय उपक्रमात कर प्रणाली संदर्भात विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून याप्रसंगी नागपूर आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त मालती श्रीधरन यांनी सांगितले की , आयकर विभाग आणि कर दाते यांच्यातील दरी कमी करण्यासाठी टेक्सपेयर हब कार्यक्रम ही एक सुरुवात आहे. या माध्यमातून कर प्रणाली विषयीची माहिती सोप्या आणि रंजक भाषेत करदाते यांना तसेच भविष्यातील करदाते असणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जाणार आहे .यासाठी सेल्फी बूथ ,माहितीपत्रक तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा या माध्यमातून देखील जनजागृती करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नागपूर मध्येच अशा प्रकारच्या कार्यक्रमाच आयोजन होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर नवीन आयकर कायद्याची माहिती देणाऱ्या चित्रदालनाचे तसेच माहितीपर किओस्कचे उद्घाटन मालती श्रीधरन यांच्या हस्ते झाले .
विद्यार्थी हे भविष्यातील करदाते आहेत. त्यासाठी त्यांना करदायित्व तसेच कर चुकवेगिरीपासून सावधानतेची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जात आहे. जे प्रामाणिक करदाते आहे त्यांना भूलथापा देऊन कर चुकवेगिरीची कोणी माहिती देत असेल त्या माहितीपासून सुद्धा कसे वाचावे याबाबत इथे मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नवीन इन्कम टॅक्स ची माहिती सोप्या भाषेत माहिती फलकाद्वारे तसेच प्रश्नमंजुषा द्वारे देण्यात येत आहे .
या 3 दिवसीय शिबिरादरम्यान नवीन इन्कम टॅक्स वर चर्चासत्र टीडीएस चा आढावा ,गुप्त वार्ता आणि गुन्हेगारी तपास संचालनालयाचे कार्य अशा विषयावर परिसंवाद होणार असून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा , प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर आयकर रेंज मधील अमरावती आणि वर्धा येथे देखील महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उद्घाटन कार्यक्रमाला आयकर विभाग नागपूरचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule